केरळमधील पोक्सो न्यायालयाचा निकाल ः दोषीला 5 लाख दंड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केरळमध्ये न्यायालयीन क्षेत्रातील एक मोठी घटना समोर आली आहे. पथमथिट्टा येथील पोक्सो न्यायालयाने बलात्कार प्रकरणात एका दोषीला 142 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने दोषी व्यक्तीला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोषीला आणखी तीन वर्षे कारावास भोगावा लागेल. 10 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आल्ली आहे. आतापर्यंत पोक्सो प्रकरणात दोषीला सुनावण्यात आलेली ही सर्वोच्च शिक्षा आहे.
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचे नाव आनंदन पीआर उर्फ बाबू असे आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बाबूला आजीवन तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 2019-20 दरम्यान 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्यावर अनेक वेळा क्रूरपणे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाबू याच्यावर 20 मार्च 2021 रोजी तिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बाबू हा पीडित मुलीच्या नात्यातीलच होता. या खटल्यात मुलीची जबानी, तिचे वैद्यकीय रेकॉर्ड तसेच इतर सर्व पुरावे सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने पुराव्याच्या आधारे आरोपीला 142 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.