रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला रविवारी 25 दिवस पूर्ण झाले आहेत. अशा स्थितीत अन्य देशांमध्ये आश्रय घेतलेल्या सुमारे 15 लाख युक्रेनियन मुलांना आता तस्करीचा धोका निर्माण झाल्याचे युनिसेफने म्हटले आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना युद्ध रोखण्यासाठी थेट चर्चेचे आवाहन केले आहे.
झेलेंस्की यांनी स्वीत्झर्लंड सरकारला रशियाच्या धनाढय़ांचा पैसा जप्त करण्याचे आवाहन केले ओह. युरोपीय शहरांमध्ये राहून स्वीस बँकांमध्ये पैसा ठेवणारे रशियाचे धनाढय़ तेथील सैन्याला युक्रेन नष्ट करण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप झेलेंस्की यांनी केला आहे.
युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू झाल्यापासून देश सोडणाऱया नागरिकांमध्ये 15 लाख मुलांचाही समावेश आहे. शरणार्थी शिबिरांमध्ये असलेल्या मुलांवर मानवी तस्करांचा डेळा आहे. कमजोर देखरेखीच्या स्थितीत लवकरच या मुलांच्या अवैध तस्करीला प्रारंभ होऊ शकतो. असंख्य मुले युक्रेनमध्ये देखील स्वतःची घरे सोडून अन्य भागांमध्ये आश्रय घेऊन असल्याचे युनिसेफकडून म्हटले गेले आहे.
पुतीन चर्चेस नाही तयार
झेलेंस्की यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे रशियाला थेट चर्चेचे आवाहन केले असले तरीही पुतीन सध्या अशा चर्चेसाठी तयार नसल्याचा दावा तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तैयप एर्दोगान यांच्या मुख्य सल्लागाराने केला आहे. नेतृत्वाच्या पातळीवर बैठकीची स्थिती अद्याप निर्माण झाली नसल्याचे पुतीन यांचे मानणे असल्याचे विधान एर्दोगान यांच्या प्रवक्त्याची भूमिका पार पाडणारे इब्राहिम कलिन यांनी केले आहे.
पूर्वेच्या देशेने कूच
युक्रेनच्या सैन्याने रशियाला राजधानी कीव्ह, खारकीव्ह आणि दक्षिण युक्रेनच्या मोठय़ा हिस्स्यावर रोखून धरले आहे. उपग्रहीय छायाचित्रात देखली कीव्हबाहेर रशियाचे सैन्य दीर्घकाळापर्यंत युद्ध करण्यासाठी तळ तयार करताना दिसून आले आहे.