नेपाळ-चीनकडून नव्या उंचीची घोषणा : 8848.86 मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर : भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण
वृत्तसंस्था/ काठमांडू
जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या उंचीसंबंधीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. माउंट एव्हरेस्टची उंची आता 8848.86 मीटर असल्याची घोषणा चीन आणि नेपाळने संयुक्तपणे केली आहे. एव्हरेस्टच्या नव्या उंचीची घोषणा नेपाळचे विदेशमंत्री प्रदीप ज्ञवली आणि चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी केली आहे. अशाप्रकारे माउंट एव्हरेस्टच्या उंचीत 86 सेंटीमीटरची भर पडली आहे.
नेपाळमध्ये 2015 मध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर माउंट एव्हरेस्टच्या उंचीत बदल झाल्याचे कयास वर्तविण्यात येत होते. परंतु आता नव्या मोजणीनंतर हा वादाचा शेवट झाला आहे. एव्हरेस्टच्या उंचीचा वाद संपविण्यासाठी चीनने काही दिवसांपूर्वी 30 सदस्यीय सर्वेक्षण पथक रवाना केले होते. हे चिनी पथक माउंट चोमोलुंगमा बेस कँपवरून एव्हरेस्ट सर करण्यासाठी रवाना झाले होते. एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचून या पथकाने ग्लोबल सॅटेलाइट सिस्टीमच्या मदतीने जगातील या सर्वोच्च शिखराची उंची मोजली होती. एव्हरेस्ट सर करणाऱया या पथकात व्यावसायिक गिर्यारोहक आणि चीनच्या नैसर्गिक साधनसंपदा मंत्रालयाचे सर्वेक्षक सामील होते.
या सर्वेक्षण पथकाने ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट आणि ग्रॅवीमीटरच्या मदतीने एव्हरेस्टची उंची मोजली आहे. हे सर्वेक्षण पथक एप्रिल महिन्याच्या प्रारंभी चोमोलुंगमा बेस कँपमध्ये पोहोचले होते. 1949 मध्ये स्वतःच्या स्थापनेनंतर चीनच्या सर्वेक्षण पथकाने आतापर्यंत 6 वेळा एव्हरेस्ट सर करून उंची मोजली आहे. चीनने 1975 आणि 2005 मध्ये एव्हरेस्टच्या उंचीचा आकडा प्रसिद्ध केला होता. तर 1975 मध्ये एव्हरेस्टची उंची 8,848.13 मीटर तर 2005 साली 8,844.43 मीटर होती.
शिखरावर ‘5जी’ सिग्नल
चीनकडून माउंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक आता याच्या शिखरावर पोहोचून जलदगतीच्या 5जी दूरसंचार सेवेचा वापर करू शकणार आहेत. दुर्गम हिमालयीन क्षेत्रात जगातील सर्वाधिक उंचीवरील बेस स्टेशनने सेवा सुरू केली आहे. चीनची दिग्गज सरकारी दूरसंचार कंपनी चायना मोबाईलनुसार हे बेस स्टेशन 6,500 मीटरच्या उंचीवर स्थापन करण्यात आले आहे. हे स्थानक जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या आधुनिक आधार शिबिरात आहे.