अन्य शाळांमध्ये सॅनिटेशन क्लबची स्थापना करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष : क्लबच्या माध्यमातून स्वच्छता राखण्याचा उपक्रम रखडण्याची चिन्हे
प्रतिनिधी /बेळगाव
कचरा विघटन, ओला व सुका कचरा वेगळा जमा करणे, कचऱयाची विल्हेवाट लावण्याबाबची माहिती तसेच स्वच्छतेबाबतची जागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे. याकरिता सॅनिटेशन क्लबची स्थापना करण्याची सूचना शहर आणि उपनगरांतील प्रत्येक शाळेला देण्यात आली होती. याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ झाला असून आतापर्यंत 15 शाळांमध्ये सॅनिटेशन क्लबची स्थापना करून याबाबतची माहिती महापालिकेला दिली.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण स्वच्छतेबाबत नागरिक जागरुक होत नाहीत. सध्या शहरात घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो. मात्र, प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे स्वच्छतेबाबतचे धडे विद्यार्थ्यांना देऊन प्रत्येक घरात स्वच्छतेची माहिती पोहचविण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या सनिटेशन क्लबची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना विविध माहिती देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. तरीदेखील म्हणावी तशी जागरुकता निर्माण झाली नाही. महापालिका व्याप्तीमध्ये सध्या घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. तरीदेखील रस्त्याशेजारी आणि खुल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पण नागरिक गटारीमध्ये किंवा नाल्यामध्ये कचरा टाकत असतात.
कचरा विघटनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष
महत्त्वाचे म्हणजे ओल्या आणि सुक्या कचऱयाचे विघटन करून देण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येते. पण याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. कचरा विघटनासाठी मोठय़ा प्रमाणात विघटन शुल्क मोजावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबतची माहिती प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी तसेच मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी शाळेतील शिक्षकांच्या नेतृत्वाखाली सॅनिटेशन क्लबची स्थापना करण्याची सूचना महापालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांतील प्रत्येक शाळेला करण्यात आली होती.
महापालिकेचा कानाडोळा
सॅनिटेशन क्लबच्या अध्यक्ष आणि सेपेटरीपदी विद्यार्थ्यांची निवड करण्याची सूचना करून क्लबची स्थापना करण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडे सोपविण्यात आली होती. सदर सूचना महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी केली होती. पण आतापर्यंत केवळ 15 शाळांमध्ये सॅनिटेशन क्लबची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या शाळांमध्ये अद्याप कोणताच जागृती कार्यक्रम महापालिकेकडून घेण्यात आला नाही. अन्य शाळांमध्ये सॅनिटेशन क्लबची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सॅनिटेशन क्लब स्थापन करण्यासाठी महापालिकेनेही कानाडोळा केला आहे. त्यामुळे सॅनिटेशन क्लबच्या माध्यमातून स्वच्छता राखण्याचा उपक्रम रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.