आम आदमी पार्टीचा साबांखावर आरोप : आपत्कालीन निधी कलमाचा केला गैरवापर,कंत्राटे केवळ मजीतील केरळी कंत्राटदाराला
प्रतिनिधी /पणजी
पणजी आणि फोंडा येथील रस्ता-दुरूस्ती बांधकामात 15 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा आम आदमी पार्टीचे सरचिटणीस फ्रान्सिस कुएलो यांनी शुक्रवारी केला. आपत्कालीन कामांसाठी निधी खर्च करण्यासंबंधी असलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत साबांखाने 50 लाखाचे काम निविदा न काढताच 15 कोटीत करवून घेतली आहेत. तसेच ही कामे स्वतःच्या मर्जीतील एका केरळी कंत्राटदाराच्या कुटुंबियांना बहाल केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गतवषी ऑक्टोबर महिन्यात 12 कोटीची कामे करवून घेतली. याशिवाय दुरूस्त झालेल्या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा एकदा साबांखाने मे 2022 मध्ये तीन कोटीची निविदा काढली, अशी माहिती कुएलो यांनी दिली.
मुख्यमंत्री, प्रधान मुख्य अभियंता सामील
पणजी आणि फोंडा येथील रस्ता-दुरूस्ती कामात 15 कोटीचा घोटाळा झाल्याचे आढळले असले तरी राज्यातील उर्वरित कामातील घोटाळय़ाची रक्कम 100 कोटीपेक्षा जास्त असू शकते. साबांखाच्या 2.2 कलम अंतर्गत कामास मंजूरी देण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री आणि साबांखाचे प्रधान मुख्य अभियंता यांनाच आहे. त्यामुळे या घोटाळय़ात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर सामील असल्याचा आरोप कुएलो यांनी केला.
पन्नास लाखांऐवजी बारा कोटी खर्च?
आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी काही उदाहरणे देतांना त्यांनी ‘गेल्या ऑक्टोबरमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गोव्यात भेट दिली होती. तत्पूर्वी पोलीस विभागाने खड्डे, स्पीड ब्रेकर आणि वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱया समस्या कमी करण्यासाठी काही रस्त्यांच्या दुरुस्तीची शिफारस केली, त्यासाठी 50 लाख खर्च येणार होता. त्यावेळी साबांखाने आपत्कालीन कलमाचा गैरवापर करत केरळच्या कंत्राटदारास 12 कोटी रुपयांचे आपत्कालीन काम करण्याचे आदेश दिले, असे ते म्हणाले.
पणजीतील कामही दिले त्याच कंत्राटदाराला
अवकाळी पावसामुळे कंत्राटदाराने नोव्हेंबरमध्ये काम सुरू केले नाही. डिसेंबरमध्ये काम सुरू झाले. परंतु साबांखाने एक्स-फॅक्टो वर्क ऑर्डर जारी केली. हे काम मार्च महिन्यात पूर्णत्वास आले आणि कंत्राटदाराला त्वरित पैसे देण्यात आले. त्यानंतर पणजीतील दुरूस्त झालेला रस्ता पुन्हा हॉटमिक्स करण्यासाठी मे महिन्यात पुन्हा तीन कोटी रुपयांची नवीन निविदा काढण्यात आली. ते कामही त्याच केरळच्या कंत्राटदारास देण्यात आले, असे कुएलो यांनी सांगितले.
मर्जीतील कंत्राटदारासच दिले कंत्राट
राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 1 ब अंतर्गत 200 कंत्राटदार आहेत. तरीही साबांखाने मर्जीतील कंत्राटदारास ते काम बहाल केले. या कंत्राटदाराचे संपूर्ण कुटुंब बांधकाम व्यवसायात गुंतलेले आहे, असे कुएलो म्हणाले. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, रुई मिनेझिस आणि प्रकाश मलानी हे देखील उपस्थित होते.
साबांखामंत्र्यांकडून कंत्राटदाराची पाठराखण : सेसिल रॉड्रिग्ज
पहिल्याच पावसात पणजीमधील रस्ते वाहून जाण्यास पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कंत्राटदाराला दोष दिला. त्यांच्या विरोधी वक्तव्य करताना साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी यासाठी कंत्राटदाराला जबाबदार धरू नये असे म्हटले. रस्ते खराब होण्यास त्यांनी पावसाला दोष दिला. यावरून स्वतः मंत्रीच कंत्राटदाराची पाठराखण करत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप आपच्या युथ विंगच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांनी केला.