Tarun Bharat

महिलेच्या चप्पलमध्ये 15 लाखांचा ड्रग

Advertisements

रेल्वेतून आलेल्या महिलेसह सीआयडीने केला जप्त : सीआयडीने कुळे ते मोलेपर्यंत केला पाठलाग

प्रतिनिधी/पणजी

गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनी मोले येथे केलेल्या कारवाईत 15 लाख 10 हजार रुपये किमंतीचा एमडीएमए हा अंमलीपदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अटक केलेल्या महिलेचे नाव दामिलॉला जॅनेट ओडुला (27 वर्षे) असे आहे. ती दिल्लीतून रेल्वेमार्गे गोव्यात आली होती. कुळे रेल्वे स्थानकावर उतरुन ती मोले येथे आली होती. मोले पेट्रोल पंपजवळ तिला सीआयडीने ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता तिच्याजवळ 151 ग्रॅम एमडीएमए अंमलीपदार्थ सापडला. पोलिसांनी त्वरित पुढील कारवाई करून तिला अटक करण्यात आली.

सीआयडीला अगोदरच मिळाली होती माहिती

ड्रग्ससह नायजेरियन महिला गोव्यात येत असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ती कुळे रेल्वे स्थानकावर उतरणार असल्याचेही समजले होते. सीआयडी पोलिसांनी तीन पथके तयार करुन लोंडा, पॅसलरॉक व कुळे अशा तीन ठिकाणी ही पथके जाळे लावून सज्ज होती.

पाठलाग करुन पकडले संशयित दामिलॉला

ती महिला कुळे रेल्वेस्थानकावर उतरली. अवघ्या काही मिनिटांतच तिने गाडी पकडली आणि जायला निघाली. पोलिसांनी तिच्या गाडीचा पाठलाग केला आणि मोले पेट्रोल पंपवर गाडी थांबली असता पोलिसांनी तिची गाडी अडवून कसून तपासणी केली.

बराच वेळ तपासणी करुनही तिच्याजवळ काहीच सापडले नसल्याने पोलिस हैराण झाले होते. मिळालेली माहिती चुकीची होती की काय असा प्रश्न पोलिसांना पडला. मात्र पोलिसांनी हार मानली नाही. शेवटी चप्पलच्या सोलमध्ये लपवून आणलेला अंमलीपदार्थ सापडला.

सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश सावंत, महिला सहाय्यक उपनिरीक्षक शितल नाईक, हवालदार इर्शाद वातंगी, उमेश देसाई, कॉन्स्टेबल महाबळेश्वर सावंत व सुदेश मारकर यांनी ही कारवाई केली. 

सीआयडीच्या नजरेतून सुटली नाही ‘ती’ चप्पल!

सीआयडीने त्या महिलेच्या बॅगेतील प्रत्येक सामान तपासून पाहिले, तेव्हा  बॅगमध्ये असलेल्या चप्पलकडे त्यांचे लक्ष गेले. पोलिसांनी त्या चप्पलची व्यवस्थित तपासणी केली तेव्हा ‘चप्पल मे कुछ तो काला’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी चप्पलाची चिरफाड केली असता आत एमडीएमए ड्रग असल्याचे उघड आले. संशयित महिलेने पोलिसांना फसविण्यासाठी चप्पलच्या खालच्याबाजूचा (सोल) थर उघडून त्यात ड्रग भरला आणि तो पुन्हा तसाच चिकटविला होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून ही ‘गडबड’ सुटली नाही आणि महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Related Stories

मडगाव आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

Patil_p

आयआयटी आंदोलन मोडीत काढण्याचे सरकारचे षडयंत्र

Patil_p

फोंडय़ात 12 हजारांचा गांजा जप्त

Patil_p

हरमल सरपंचपदी मनोहर केरकर यांचा बिनविरोध निवड

Amit Kulkarni

येत्या आठ दिवसांत खोर्ली सीम येथील नाला साफ न केल्यास पालिकेच्या निषेधार्थ रस्त्यावर ठाण

Amit Kulkarni

गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस पुन्हा वास्कोतून सुरु

Patil_p
error: Content is protected !!