झारखंडमधील न्यायालयाचा निर्णय : 7 जणांना 10 वर्षांची शिक्षा : 3 वर्षांपूर्वी टोळीयुद्धातून झाली होती हत्या
जमशेदपूर / वृत्तसंस्था
झारखंडच्या पूर्व सिंगभूम जिल्हय़ातील न्यायालयाने गुरुवारी 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच इतर सात जणांना भादंवि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत दोषी ठरवून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2019 मध्ये जमशेदपूर येथील घघिडीह मध्यवर्ती कारागृहात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात एका कैद्याची हत्या केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-4 राजेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने 15 जणांना आयपीसी कलम 302 (हत्या) आणि 120बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली, असे अतिरिक्त सरकारी वकील राजीव कुमार यांनी सांगितले. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांपैकी दोघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दोन बेपत्ता दोषींविरुद्ध आवश्यक कारवाई सुरू करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले. त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
25 जून 2019 रोजी तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात मनोजकुमार सिंग याच्यासह दोन कैद्यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेत असतानाच मनोजकुमार सिंग याचा मृत्यू झाला. या हिंसाचारप्रकरणी परसुडीह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे. कारागृहातील टेलिफोन बूथवरून कॉल करण्यावरून कैद्यांमध्ये वाद झाला होता. गँगस्टर अखिलेश सिंगच्या टोळीचा सदस्य हरीश सिंग याच्यासोबत दुसऱया टोळीतील पंकज दुबे याचा वाद सुरू झाला. अखिलेश सिंगचे साथीदार सुमित सिंग, मनोजकुमार सिंग आणि इतरांनी पंकज दुबे यांना मारहाण केली. याच्या निषेधार्थ, शिक्षा झालेल्या कैद्यांनी हरीश सिंग गटावर हल्ला केला आणि गोंधळ उडाला. यादरम्यान मनोज सिंग यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.
शिक्षा झालेल्यांची नावे जाहीर
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 15 दोषींमध्ये श्यामू जोजो, पंचानन पात्रो, पिंकू पूर्ती, अजय मल्ला, अरुपकुमार बोस, रामराय सुरीन, रमाई कारुआ, गंगाधर खंडाईत, रामेश्वर अंगरिया, गोपाल तिरिया, शरत गोप, वासुदेव महतो, जानी अन्सारा, शिवशंकर पासवान आणि संजय डिग्गी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शोएब अख्तर, मो तौकीर, अजित दास, सोनू लाल, सुमित सिंग, ऋषी लोहार आणि सौरभ सिंग या सात जणांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.