हॅलोविन फेस्टिव्हलदरम्यान दुर्घटना ः गर्दीमुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका
सेऊल / वृत्तसंस्था
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी उशिरा हॅलोविनच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 150 जणांचा मृत्यू झाला. तर 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो. इटावॉन लेजर जिह्यातील एका अरुंद रस्त्यावर गर्दी जमल्याने ही दुर्घटना घडल्याचे नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितले. या उत्सवात सहभागींपैकी अनेकांना प्रचंड गर्दीमुळे हृदयविकाराचा झटका आला आहे.
इटावॉन लेजर भागात शनिवारी रात्री अचानक हॅलोविन फेस्टिव्हल आयोजनादरम्यान गर्दी वाढल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीत चिरडून काही जणांना जीवही गमवावा लागला. चेंगराचेंगरी होऊन कित्येकांना प्राणास मुकावे लागल्याने या घटनेबाबत जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींपैकी सुमारे 250 जणांवर उपचार सुरू आहेत. हॅलोविन फेस्टिव्हलला उपस्थित प्रचंड गर्दीमुळे सुमारे 50 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. देशभरातील 400 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. या सर्व लोकांना जखमींवर उपचारासाठी तैनात करण्यात आले आहे. घटनेचे खरे कारण जाणून घेण्यासाठी अद्याप तपास सुरू आहे.
सेलिब्रिटीचे आगमन… अन् लोकांची धावपळ!
चेंगराचेंगरीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॅलोविन फेस्टिव्हलमध्ये गर्दी होत असताना ही घटना घडली. शेकडो लोक एका अरुंद गल्लीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी एक निवेदन जारी करून रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवावेळी एका सेलिब्रिटीच्या आगमनाची घोषणा झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोक त्या दिशेने धावू लागल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात आले.
हॅलोविन महोत्सवाविषयी…
हॅलोविन हा सण अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन देशांमध्ये साजरा केला जातो, परंतु या सणाचा उगम आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये झाला. पाश्चिमात्य देशांमध्ये हॅलोविन सण साजरा केला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हा सण साजरा केला जातो, असे मानले जाते. या दिवशी लोक वेगवेगळय़ा स्वरुपाचे मेकअप करण्याबरोबरच भीतीदायक पोशाखही घालतात. हॅलोविनचा उगम प्राचीन सेल्टिक उत्सव सॅमहेनपासून झाला आहे. ख्रिश्चन समाजातील लोक हा सण मोठय़ा थाटामाटात साजरा करतात.