पीओकेमधील दहशतवाद्यांच्या संख्येत वाढ : सुरक्षा यंत्रणा सतर्क
वृत्तसंस्था / श्रीनगर
पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेतील दहशतवाद्यांच्या तळांवरील दहशतवाद्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातून समोर आली आहे. पीओकेतील दहशतवाद्यांचे काळी तळ नियंत्रण रेषेनजीक हलविण्यात आल्याचे समजते. नियंत्रण रेषेच्या नजीक असलेल्या लाँचिग पॅडवर 150 दहशतवादी असून ते घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती मल्टी एजेन्सी सेंटरच्या नव्या अहवालातून प्राप्त झाली आहे.
हिमवृष्टी होण्यापूर्वी नियंत्रण रेषेवर सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. सीमेवरील भारतीय सुरक्षा यंत्रणांमुळे सतर्कतेमुळे जैशöए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटना सातत्याने रणनीतिंमध्ये बदल करत असल्याचे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेशी निगडित एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
नियंत्रण रेषा आणि पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पोहोचविण्यासाठी भुयारांचा वापर केला जात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. काही महिन्यांपूर्वी बीएसएफने जम्मूमधील सीमेवर अशाच प्रकारच्या एका भुयाराचा शोध लावला होता.
ड्रोनच्या हालचाली दुप्पट
जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रs अन् दारूगोळय़ाचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमेत ड्रोनच्या हालचाली दुप्पट झाल्या आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये ड्रोनच्या 109 हालचाली टिपल्या गेल्या होत्या. तर चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत ही संख्या वाढून 214 झाली आहे. बीएसएफने चालू वर्षात पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसखोरी करत असलेल्या 9 ड्रोन्सना नष्ट केले आहे.
पाकिस्तान बिथरलाय
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने स्थिती सुरळीत होत असल्याने बिथरली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱयादरम्यान मोठय़ा संख्येत लोकांनी त्यांच्या सभेत भाग घेतला होता. बारामुल्लामध्ये मागील 35 वर्षांमध्ये कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांची झालेली सभा आणि यात ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्याने पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात आतापर्यंत उच्चांकी 1.62 कोटी पर्यटक पोहोचले आहेत.