तपासातील उत्तम कामगिरीचा होणार गौरव : गृह मंत्रालयाकडून यादी जाहीर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
तपासातील उत्तम कामगिरीसाठी ‘केंदीय गृहमंत्र्यांकडून प्रदान होणाऱ्या पदका’द्वारे 152 पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे. 2018 च्या प्रारंभी हे पदक देण्यास प्रारंभ करण्यात आला होता. गुन्ह्यांच्या तपासातील उच्च व्यावसायिक मापदंडांना चालना देणे आणि तपास अधिकाऱ्यांकडून तपासात करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीची ओळख पटविणे हा यामागचा उद्देश होता.
यंदा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये सीबीआयचे 15, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलीस विभागाचे प्रत्येकी 11, उत्तरप्रदेश पोलीस दलाचे 10, केरळ आणि राजस्थान पोलीस विभागाचे प्रत्येकी 9, तामिळनाडू पोलीस विभागाचे 8, बिहारचे 7, गुजरात अन् कर्नाटक तसेच दिल्ली पोलीस विभागातील प्रत्येकी 6 कर्मचारी सामील आहेत. पदकविजेत्यांमध्ये 28 महिला पोलीस अधिकारी सामील असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. मागील वर्षी 121 पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले होते. यात 15 सीबीआयचे, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 10, उत्तरप्रदेशमधील 8 तर केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 7 पोलीस सामील होते. तसेच उर्वरित कर्मचारी अन्य राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील होते. त्यात 21 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता.