काँग्रेसकडून 11 लाख तर प्रकाश हुक्केरी यांच्याकडून 5 लाख रुपये
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा येथील रस्त्याची तसेच इतर कामे केलेल्या कंत्राटदाराला कमिशनसाठी त्याचे बिल दिले गेले नाही. त्यामुळे त्या कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. संतोष पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसने या कुटुंबाला मदतीचा हात दिला असून पक्षाच्यावतीने 11 लाख रुपये तर काँग्रेसचे ज्ये÷ नेते प्रकाश हुक्केरी यांनी वैयक्तिक 5 लाखांची मदत मंगळवारी दिली आहे.
मंगळवारी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी बडस येथे जाऊन मयत संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या ठिकाणी काँग्रेसच्यावतीने त्यांना मदत देण्यात आली. याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनदेखील करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. याप्रकरणी मंत्री ईश्वराप्पा यांनी राजीनामादेखील दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. उडुपी येथील पोलिसांचे पथक बेळगावात दाखल झाले आहे. याचबरोबर सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी यांनी या पथकाकडून माहिती घेतली आहे. ग्रामपंचायतमधील अध्यक्ष तसेच पीडीओंचीही चौकशी केली आहे. तत्कालीन पीडीओ गंगाधर एस. यांचीही चौकशी करण्यात आली आहे. एकूणच या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. तर पोलीस अधिकारीही चौकशी करत असल्यामुळे ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य यांच्यासह अधिकाऱयांचीही चांगलीच भंबेरी उडाली आहे.
अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांची चौकशी
संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी उडुपीचे पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या पथकाने हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांची चौकशी केली. संतोष पाटील यांनी केलेल्या 108 विकासकामांची माहिती जाणून घेतली. याचबरोबर काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. यावेळी मन्नोळकर यांनी सबकंत्राटदाराने केलेल्या कामांचीही माहिती दिली आहे.