डिसेंबर तिमाहीत 110 कोटींचा नफा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाईस जेटच्या नफ्यामध्ये 161 टक्के इतकी डिसेंबर अखेरच्या तिमाहीमध्ये वाढ नोंदविली गेली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये स्पाईस जेटने विक्रमी स्तरावर 110 कोटी रुपये निव्वळ नफा कमाविला आहे. याच जोडीला कंपनीने 2317 कोटी रुपयांचा महसूल याच कालावधीत प्राप्त केला आहे.
प्रवाशांची संख्या व विमानांची संख्या सदरच्या तिमाहीमध्ये जास्त राहिल्याने कंपनीला नफा चांगला प्राप्त करणे शक्य झाले आहे. 2021 मध्ये डिसेंबरअखेर कंपनीने 42 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. कंपनीचा डिसेंबर अखेरच्या तिमाहीतील महसूल 2 टक्के वाढला आहे. जो 2021 मध्ये समान तिमाहीत 2267 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या उत्पन्नामध्ये 21 टक्के वाढ दर्शविण्यात आली आहे.
2022 मध्ये प्रत्येक महिन्याला प्रवाशांची संख्या बऱयापैकी राहिली आहे. प्रवासी विमान सेवेसोबतच कार्गो सेवेतही कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे. या कामगिरीच्या बळावरच डिसेंबर अखेरच्या तिमाहीत नफा आणि महसूल वाढीमध्ये कंपनीने लक्षणीय कामगिरी साध्य केली आहे.