रामायण सर्किट ट्रेन – पहिला मुक्काम अयोध्येत
भगवान श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी भारतीय रेल्वेची रामायण सर्किट ट्रेन दिल्लीच्या सफदरगंज येथून रविवारी रवाना झाली आहे. भगवान श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख स्थळांचे दर्शन घडविण्यासह ही रेल्वे अयोध्येसह अनेक ठिकाणी जाणार आहे.
रामायण सर्किट ट्रेनद्वारे भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांचे दर्शन करविणार आहे. या रेल्वेद्वारे 7,500 किलोमीटरची यात्रा 17 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. यात्रेचा पहिला मुक्काम अयोध्येत असेल, जेथे श्रीराम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिराचे दर्शन करविले जाणार आहे.
अयोध्येतून ही रेल्वे सीतामढी येथे जाणार आहे. तेथे माता जानकी यांचे जन्मस्थान आणि नेपाळमधील राम-जानकी मंदिराचे दर्शन होणार आहे. तर रेल्वेचा पुढील मुक्काम भगवान शिवाची नगरी काशी येथे असणार आहे. त्यानंतर चित्रकूट आणि तेथून नाशिकमध्ये रेल्वे पोहोचेल. नाशिकनंतर प्राचीन किष्किन्धा नगरी हम्पी मध्ये रेल्वे पोहोचणार आहे. तेथे अंजनी पर्वतावरील हनुमान जन्मस्थळाचे दर्शन करविण्यात येणार आहे.
या रेल्वेचा अखेरचा मुक्काम रामेश्वरम येथे असणार आहे. रामेश्वरम येथून ही रेल्वे 17 व्या दिवशी दिल्लीत परतणार आहे. या यात्रेसाठी एसी फर्स्ट क्लासचे बुकिंग 1,02,095 रुपये तर सेकंड क्लासमध्ये 82,950 रुपयांमध्ये झाले आहे. या रेल्वेची बुकिंग पूर्वीच फुल झाली असून सातत्याने भाविकांकडून अशाप्रकारच्या रेल्वेची मागणी करण्यात येतेय. तर आयआरसीटीसीने या रेल्वेसोबतच आणखीन 4 रामायण सर्किट ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. आता 16 नोव्हेंबर रोजी दुसरी, 25 नोव्हेंबर रोजी तिसरी तर 27 नोव्हेंबर रोजी चौथी आणि 20 जानेवारीपासून पाचवी रेल्वे धावणार आहे.