गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची झाली नोंद
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एक विक्रम नोंदविला गेला आहे. हा विक्रम काहीसा अजब आहे. शाळा-महाविद्यालय आणि कार्यालयांमध्ये समान नाव असणारी काही लोक भेटत असतात. परंतु जपानमध्ये एकाच ठिकाणी एकच नाव असलेले 178 लोक एकत्र आल्याने हा विक्रम गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेला आहे.
हिरोकाजू तनाका नावाचे 178 लोक टोकियोच्या शिबुया जिल्हय़ातील एका ऑडिटोरियममध्ये एकत्र आले आणि ‘एकाच नावाच्या लोकांची सर्वात मोठी सभा’ याकरता गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या लोकांनी मागील विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी मार्था स्टीवर्ट्स नावाच्या 164 लोकांनी 2005 मध्ये अमेरिकेत एकत्र येत विक्रम नोंदविला होता.
हिरोकाजू तनाकाचा पुढाकार
या सभेची व्यवस्था टोकियोतील एक कॉर्पोरेट कर्मचारी हिरोकाजू तनाकाने केली होती. 53 वर्षीय तनाकाला 1994 मध्ये त्याच्यासारखेच नाव असलेल्या लोकांबद्दल उत्सुकता होती. त्याने बेसबॉलपटू हिरोकाजू तनाकाला ओसाका किंतेत्सु टीममध्ये पाहिले होते. बेसबॉलपटू हिरोकाजू देखील या विक्रमी सभेत सामील झाला होता.
हिरोकाजू तनाकाकडून स्वतःच्या नावावर विक्रम नोंदविण्याचा हा तिसरा प्रयत्न होता. या सभेत सामील सर्वात कमी वयाचा हिरोकाजू तनाका केवळ तीन वर्षांचा होता. तर सर्वात वृद्ध हिरोकाजू 80 वर्षांच होता. एका व्यक्तीने व्हिएतनामच्या हनोई येथून येत या सभेत भाग घेतला आहे. या सभेचा व्हिडिओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.