खासगी लसीकरण केंद्रांवर सुविधा :दुसरा डोस घेऊन, नऊ महिने पूर्ण झालेल्यांनाच मिळेल बूस्टर डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना उद्या म्हणजेच 10 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. नऊ महिन्यांपूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आता खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीचा बूस्टर डोस घेता येईल, असे आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले. आगामी काळात होणाऱया संभाव्य कोरोना संसर्ग धोक्यापासून त्यांना संरक्षण मिळू शकते.
कोरोना लसीचा बूस्टर डोस 18 वर्षांवरील प्रौढांसाठी असून दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेल्यांना मिळणार आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबतचे पत्रक काढत घोषणा केली. तसेच लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवताना सरकार बूस्टर डोसचा वयोगट वाढवत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर दिली.
सध्या सरकारी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, प्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वर्षे वय असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. आतापर्यंत 2.4 कोटी बूस्टर डोस हे आरोग्य कर्मचारी, प्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वयोमान असलेल्यांना देण्यात आले आहेत. तसेच भारतातील 15 वर्षांवरील 96 टक्के व्यक्तींनी आतापर्यंत लसीचा पहिला डोस, तर 83 टक्के व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय, 12-14 वयोगटातील 45 टक्के लाभार्थींनाही पहिला डोस मिळाला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
पात्र लाभार्थींना सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेल्या मोफत कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाला पहिला आणि दुसरा डोस तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, प्रंटलाईन कामगार आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी खबरदारीचा डोस देण्यात येईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.