ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अरूणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर रस्ते बांधणीचे काम करणारे 18 मजूर 5 जुलैपासून बेपत्ता आहेत. तर एकाचा मृतदेह सोमवारी रात्री डेमिनमधील कुमा नदीत आढळून आला आहे. हे सर्व बेपत्ता मजूर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (BRO) आहेत.
कुरुंग कुमारी उपायुक्त निघी बेंगिया यांनी सांगितले की, बेपत्ता मजुरांना बीआरओने रस्ते बांधणीसाठी अरुणाचलमध्ये आणले होते. ईदच्या निमित्ताने या मजुरांना आसाममध्ये त्यांच्या घरी जायचे होते. त्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडे रजा मागितली. पण रजा मंजूर झाली नाही. त्यामुळे ठेकेदाराला न जुमानता हे मजूर 5 जुलैला पायी चालत आसामच्या दिशेने रवाना झाले.
या मजुरांमधील एकाचा मृतदेह सोमवारी रात्री डेमिनमधील कुमा नदीत आढळून आला आहे. सध्या अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून, हे सर्व कामगार नदी पार करत असताना बुडाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेपत्ता मजुरांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : काँग्रेसमधील वातावरण असंतुष्ट, राजीनामा देण्याचीही अनेकांची तयारी