वृत्तसंस्था / विजयवाडा
आंध्र प्रदेशातील जनकापल्ली येथील एका कारखान्यातील रिअॅक्टरला लागलेल्या भीषण आगीत 18 जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सिमेंट कारखान्याच्या सयंत्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने साहाय्यता कार्य हाती घेतले आहे.
जखमींमध्ये आंध्र प्रदेशातील स्थानिक कामगारांसमवेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही कामगारांचाही समावेश आहे. दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेची दखल घेत स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवला आहे. जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जातील अशी घोषणा करण्यात आली आहे.