16 महिलांचा समावेश : वाहन 20 फूट खोल दरीत कोसळले
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यातील कुकदूर येथे सोमवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. येथे पिकअप वाहन उलटून 18 जणांचा मृत्यू झाला. बैगा आदिवासी तेंदूपत्ता तोडून परतत असताना पिकअप वाहन दरीत कोसळले. पिकअपमधून 25-30 कामगार प्रवास करत होते. त्यापैकी या अपघातात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व कुई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्तीसगडचे कावर्धाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. अपघातामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी नागमोडी वळणाचा अंदाज न आल्याने प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन दरीत कोसळले असावे, असा तर्क व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांनी मदतकार्य राबवले. तसेच अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
जिह्यातील कुकदूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ हा अपघात झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कुई गावात राहणारे ग्रामस्थ तेंदूपत्ता काढण्यासाठी गेले होते. ते पिकअप वाहनाने आपल्या गावी परतत असताना बहपनी गावाजवळ गाडी दरीत कोसळल्याचेही सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. यासंदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री विष्णूदेव साई मदत आणि बचाव कार्यासाठी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अऊण साओ यांनी कावर्धा दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ही अत्यंत दु:खद घटना आहे. अपघाताचे कारण तपासानंतर कळेल. प्रशासन अद्याप अपघातग्रस्तांना दिलासा देण्याचे काम करत आहे. चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.