वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यंदाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. संसदीय कामकाज समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन घेण्याच्या प्रस्तावाची शिफारस केली होती. केंद्र सरकारने या शिफारसीवर सहमती दर्शविली असून 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी संसदीय अधिवेशन नियोजित केले आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने नव्या मंत्र्यांच्या निवडीबाबत वेगवेगळय़ा पातळीवर चर्चा-बैठकांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे.
पावसाळी अधिवेशनासंबंधी 29 जून रोजी संसदीय कार्य समितीने बैठक घेतली होती. या बैठकीत 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीसाठी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस त्यांनी केंद्र सरकारला केली होती. संसदीय कार्य समितीने सादर केलेल्या पावसाळी संसदीय अधिवेशनाला केंद्र सरकारने सहमती दर्शविली आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे.