दापोली-वणंद येथील स्मारकाची भीमराव आंबेडकरांसह अधिकाऱयांकडून पाहणी : पुढीलवर्षी फेबुवारीत उद्घाटन
मनोज पवार / दापोली
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा जीवनपट आता 19 भित्तीशिल्पांद्वारे नव्याने जगाच्या समोर येणार आहे. यासाठी दापोली तालुक्यातील वणंद येथे असणाऱया माता रमाई स्मारकाची बुधवारी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर व अधिकाऱयांनी पाहणी केली. माता रमाई यांच्या जयंतीच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील वणंद. येथे बौद्ध महासभेने माता रमाई यांच्या नावाने जागतिक दर्जाच्या स्मारकाची उभारणी केली आहे. आमदार भाई गिरकर यांनी पुढाकार घेऊन येथे येणाऱया आंबेडकर प्रेमींसाठी निवास व्यवस्थाही केली आहे. या सर्व प्रकल्पाची पाहाणी करण्यासाठी भीमराव आंबेडकर बुधवारी दापोलीत आले होते. माता रमाईंच्या स्मारकाच्या इमारतीत तळमजल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित 19 भित्तिशिल्प उभारण्यात येणार आहेत. या भित्तीशिल्पांखाली त्याबद्दल सविस्तर माहितीही असणार आहे. यातून बाबासाहेबांचा जीवनपट सहजपणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे.
माता रमाई यांच्या जयंतीच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी देशभरातून आंबेडकर अनुयायी दापोलीत येतील, अशी माहिती भीमराव आंबेडकर यांनी दिली. या स्मारकासमोर म्युझिकल लाईट असणाऱया कारंजांची उभारणी करण्यात येणार आहे. स्मारकाला सांची स्तूप दर्जाचा दरवाजा बनवण्यात येणार आहे. तळमजला वातानुकूलित, पहिल्या मजल्यावर विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. हा मजला प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. येथे येणाऱया आंबेडकरप्रेमींच्या निवासासाठी 100 लोकांच्या क्षमतेचे भवनही बांधण्यात आले आहे. ग्रामस्थ या सर्व लोकांची जेवणाची व्यवस्था करतात.
बाबासाहेबांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित व्हावा, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अभियंता जे. एम. पटेल, आर्किटेक्ट संदीप शेखर, ठेकेदार अनिल साळुंखे, प्रमोद जोशी, अभियंता दीपक पवार, प्रकल्प समन्वयक चंद्रमणी गमरे, दीपक धोत्रे, अमोल धोत्रे, पवन धोत्रे, मनीष धोत्रे, हरिश्चंद्र धोत्रे, विजय धोत्रे, सुनील धोत्रे उपस्थित होते.
नावाला साजेसे स्मारक उभारण्याचा प्रयत्न
बाबासाहेबांचे मूळगाव आंबडवे दापोलीलगतच्या मंडणगड तालुक्यात आहे. हा सर्व परिसर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असल्याने त्यांच्या नावाला साजेसे स्मारक येथे उभारण्यात येईल, अशी माहिती भीमराव आंबेडकर यांनी दिली. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर दापोली शहरातील काळकाईकोंड येथे ज्या खोलीत वास्तव्यास होते, ती छोटी खोलीही विकसित करण्यात येणार आहे. तिचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
दापोलीत जागतिक दर्जाच्या महाविद्यालयाचा प्रस्ताव
शहरातील नर्सरी रोडवर पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची मोठी जागा झाडेझुडपे व वेलींनी वेढलेल्या स्थितीत पडून आहे. तेथेही आता बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या नावाने जागतिक दर्जाचे महाविद्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती भीमराव आंबेडकर यांनी दिली.