बेनोनी / वृत्तसंस्था
एकोणीस वर्षांखालील महिलांसाठीच्या पहिल्यावहिल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. अशा विश्वचषक स्पर्धेची मागणी गेल्या काही दशकांपासून होत होती. ती आता मान्य झाल्याने तरुण महिलांना क्रिकेट या खेळात आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची बहुमोल संधी मिळणार आहे. 1988 मध्ये एकोणीस वर्षांखालील पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून महिलांसाठीही अशाच विश्वचषक स्पर्धेची मागणी होत होती. आता ती प्रत्यक्षात साकारणार आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये महिला क्रिकेटची मोठय़ा प्रमाणात वाढ जगभरात झाली आहे. शनिवारपासून प्रारंभ होत असलेली ही स्पर्धा याच विस्ताराचे द्योतक मानली जात आहे. या स्पर्धेत चार विविध पेंद्रांवर एकंदर 41 सामने होणार आहेत. या स्पर्धेत 16 देशांचे संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा वास्तविक 2021 मध्ये आयोजित केली जाणार होती. तथापि, कोरोनाच्या जागतिक उद्रेकामुळे ती 2021 मध्ये आयोजित करणे शक्य झाले नाही. आता ती होत आहे.
ही पहिलीच अशी स्पर्धा आयोजित करण्याचा मान दक्षिण आफ्रीका या देशाला मिळाला आहे. स्पर्धेला प्रारंभ होण्याआधी एक दिवस सर्व 16 संघांच्या कप्तानांचा एक ऐतिहासिक संयुक्त छायाचित्र सोहळा जोहान्सबर्गच्या नेल्सन मंडेला चौकात आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताच्या महिला क्रिकेटचे भवितव्य ज्यांच्या हाती आहे अशा युवा महिला खेळाडूंचा जगप्रसिद्ध आणि अनुभवी खेळाडू मिथाली राज यांच्याशी संवाद घडवून आणण्यात आला. राज यांनी क्रिकेटची रहस्ये उगवत्या खेळाडूना समजावून सांगितली आणि त्यांचा उत्साह वाढविला.
या स्पर्धेत 11 पूर्ण सदस्य संघ आणि पाच अतिथी संघ सहभागी होत आहेत. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे पूर्ण सदस्य संघ आहेत. तर युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, रवांडा, स्कॉटलंड आणि इंडोनेशिया हे पाच अतिथी संघ आहेत. या सोळा संघांचे चार गट करण्यात आले असून भारताचा समावेश यजमान दक्षिण आफ्रिकेसह ‘सी’ गटात झाला आहे.