माजगावचा सुपुत्र मयुरेश मेस्त्री
ओटवणे / प्रतिनिधी:
माजगावचा सुपुत्र मयुरेश सुंदर मेस्त्री याची 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्याचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन होतं आहे. आग्रा येथे झालेल्या टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश व टेनिसबॉल क्रिकेट फेडरशन ऑफ इंडिया, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या स्पर्धेत या 19 वर्षाखालील भारतीय टेनिसबॉल क्रिकेट टीमची निवड करण्यात आली. या स्पर्धेत मयुरेश मेस्त्री याने पाच सामन्यात भेदक व अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत पाच सामन्यात १३ गडी बाद केले होते. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. या राष्ट्रीय स्पर्धेतून देशातील एकूण १४ जणांचा समावेश असलेली १९ वर्षांखालील भारताची टीम निवडण्यात आली. यात महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश असुन सिंधुदुर्गातील दोघांचा समावेश आहे. या संघाचा कर्णधार सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याने आणि भेदक गोलंदाजीमुळे प्रत्यक्ष मैदानावरील अंतिम ११ जणात मयुरेश मेस्त्रीची निवड निश्चित मानली जात आहे.
मयुरेश मेस्त्री याचवर्षी तामिळनाडूत कन्याकुमारी येथे झालेल्या नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या टीममधुन खेळला होता. या स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली होती. मयुरेश मेस्त्रीला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तथा टेनिस बॉल क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश तांबिटकर (रत्नागिरी) यांचे मार्गदर्शन लाभले. मयुरेशच्या घरची परिस्थिती गरीबीची असुन क्रिकेटची आवड आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन संघात स्थान मिळवले आहे.