चाहत्यांसाठी 51 दिवसांच्या कालावधीत बहुप्रतीक्षित मेजवानी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा दोनवेळा लांबणीवर टाकली गेलेली बहुप्रतीक्षित आयपीएल स्पर्धा दि. 16 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयपीएल कार्यकारिणीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी शुक्रवारी केली. अंतिम तपशील व वेळापत्रकावर संमतीसाठी आयपीएल कार्यकारिणी पुढील आठवडय़ात केंदीय मंत्रालयाची भेट घेणार आहे. पण, त्यापूर्वीच त्यांनी संघातील प्रँचायझींना या नियोजनाची रीतसर माहिती दिली असल्याचे सूत्रांकडून कळते.
‘आयपीएलची कार्यकारिणी लवकरच संबधितांची भेट घेईल. पण, आम्ही यंदाच्या स्पर्धेची रुपरेषा निश्चित केली आहे. यंदा या स्पर्धेचा प्रारंभ दि. 19 सप्टेंबर रोजी होईल आणि दि. 8 नोव्हेंबरपर्यंत ती चालेल. पूर्ण 51 दिवसांचा हा कालावधी असणार आहे. आम्हाला केंद्राच्या संमतीची अपेक्षा आहे’, असे पटेल वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
मागील आठवडय़ात आयसीसीने ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आणि त्यानंतर आयपीएलसाठी यंदाची आवृत्ती आयोजित करण्याचा मार्ग खुला झाला. संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा आयोजित करताना कोव्हिड-19 च्या जागतिक महासंकटाचा बीमोड कसा करायचा, यावर बीसीसीआय अमिरात क्रिकेट मंडळाशी लवकरच लेखी संपर्क करेल, असे संकेत आहेत.
वास्तविक, ही स्पर्धा दि. 26 सप्टेंबरपासून सुरु होईल, अशी अटकळ यापूर्वी बांधली जात होती. पण, ऑस्ट्रेलिया दौऱयाचे नियोजन अडचणीत येऊ नये, या दृष्टीने त्यांनी आयपीएल स्पर्धा एक आठवडा लवकर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार, भारतीय संघाला तेथे 14 दिवस क्वारन्टाईन व्हावे लागणार आहे. ती बाब नजरेसमोर ठेवत बीसीसीआयने हा बदल केला आहे.
‘सामने किंवा दिवस यात कोणतीही काटछाट न करता आम्ही यंदाही पूर्ण स्वरुपात आयपीएल स्पर्धा भरवत आहोत. आठवडय़ातील सातही दिवस पूर्ण क्रिकेट खेळवले जाणार असल्याने प्रक्षेपण करणारे ब्रॉडकास्टर्स देखील खुश असतील’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
गर्भश्रीमंत आयपीएल स्पर्धा प्रारंभिक नियोजनानुसार मार्चअखेरीस सुरु होणे अपेक्षित होते. पण, कोव्हिड-19 चे महासंकट आणि प्रवासावरील निर्बंध, यामुळे ही स्पर्धा पुढे अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मात्र ही स्पर्धा यंदा कोणत्याही कालावधीत होणारच, याचा पुनरुच्चार वेळोवेळी केला होता
सरावासाठी आयसीसी अकादमी भाडे तत्त्वावर घेण्याचे संकेत
या स्पर्धेतील सहभागी संघांना पुरेसा सराव करता यावा, यासाठी बीसीसीआय नजीकच्या कालावधीत आयसीसी अकादमीची मैदाने भाडे तत्त्वावर घेईल, असे संकेत आहेत. आयसीसी अकादमीची दोन पूर्ण मोठय़ा आकाराची मैदाने असून त्यात 38 टर्फ पिचेस, 6 इनडोअर पिच आहेत. शिवाय, 5700 स्क्वेअर फूट आऊटडोअर एरिया आहे. यात फीजिओथेरपी, मेडिसिन सेंटरचा देखील समावेश आहे.
दुबईत क्वॉरन्टाईन होण्याची गरज नाही
दुबईतील आरोग्य प्रोटोकॉलनुसार सध्या तेथे जर कोव्हिड-19 चा निगेटिव्ह अहवाल सोबत असेल तर क्वारन्टाईन होण्याची गरज नाही. मात्र, कोव्हिड-19 चा निगेटिव्ह अहवाल सोबत नसेल तर कोव्हिड चाचणी करुन घेणे सक्तीचे आहे. निगेटिव्ह अहवाल असल्यास क्वारन्टाईनची सक्ती नसल्याने ही बाब खेळाडू व मंडळासाठी पथ्यावर पडणारी आहे.
5 नव्हे, यंदा होणार 12 डबल हेडर्स!
यापूर्वी, बीसीसीआयने जी प्राथमिक रुपरेषा आखली, त्यानुसार, फक्त 5 डबलहेडर्स (एकाच दिवसात 2 सामने) होणार होते. पण, सुधारित रुपरेषेनुसार, यंदा 5 ऐवजी 12 डबलहेडर्स असतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ असा होतो की, शनिवार व रविवार या आठवडय़ाअखेरच्या दोन्ही दिवसात प्रत्येकी 2-2 सामने खेळवले जाणार आहेत.
प्रँचायझींकडून 20 ऑगस्टपासून नियोजन प्रत्यक्ष स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार असली तरी कोव्हिड-19 मुळे सक्तीचा ब्रेक घ्यावा लागलेल्या खेळाडूंना किमान एका महिन्याचा सराव करणे क्रमप्राप्त असणार आहे. या पार्श्वभूमीवर, सहभागी प्रत्येक प्रँचायझींकडून आपापल्या खेळाडूंचे 20 ऑगस्टपासूनच नियोजन केले जाणे अपेक्षित आहे.