पुणे / वार्ताहर :
बिटकॉईन देण्याचे अमिष दाखवून एका व्यवसायिकाकडून 19 लाख 70 हजार रुपये घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपीला कर्जतमधून अटक केली आहे.
प्रियेश ऊर्फ मुकुल अनिल राव (वय 34, रा. दहीवली, ता. कर्जत, रायगड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुलदीप कदम यांनी शिवाजीनगर पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकूल राव याने कुलदीप कदम यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात बिटकॉईन विक्री करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सुजॉय पॉल आणि मंगेश कदम यांना पाठवले होते. त्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करुन मुकूल याच्या सांगण्यावरुन तीन बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवत रंजित जरनैल सिंह याच्या बँक खात्यावर 19 लाख 70 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, अनेक दिवस उलटले तरी देखील बिटकॉईन न मिळाल्याने तक्रारदार यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कलदीप यांनी पोलिसात धाव घेतली.
अधिक वाचा : राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख
या प्रकरणाचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलिसांनी कर्जतमधून मुख्य आरोपी मुकूल रावला अटक केली. त्याच्याकडून 7 मोबाईल, 10 सिमकार्ड, 18 वेगवेगळ्या बँकांचे पासबूक आणि 8 एटीएम जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात मुकूलचे साथीदार प्रियेश राव, रंजिन सिंह (37, रा. मीरा भाईंदर, ठाणे), शब्बीर शेख (41, रा. मीरा रोड, मुंबई), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी, पुणे) व मंगेश कदम (रा. गोखलेनगर, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.