Tarun Bharat

पाणी चोरी, गळतीमुळे 19 कोटींचा फटका:महापालिकेला 70 एमएलडीचा हिशोब लागेना

रोज उपसा 140 एमएलडी, बिलिंग 65 ते 70 एमएलडीचे
पाणीपट्टी, विज बील, जलशुद्धीकरणाचा खर्च ‘पाण्यात’

कोल्हापूर /विनोद सावंत

महापालिका नदीतून रोज 140 एमएलडी (दक्षलक्ष लिटर) पाण्याचा उपसा करते. मात्र, बिलिंग केवळ 65 ते 70 एमएलडीचेच होत आहे. याचा अर्थ रोजच्या 70 एमएलडी पाण्याचा हिशोबच लागत नाही. ‘गळक्या पाईपलाईन आणि पाणी चोरांकडे दुर्लक्ष’ यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी, उपसासाठी येणारे वीज बील आणि जलशुद्धीकरण आदीवर खर्च वाया जात असून यातून महापालिकेला वर्षाला 19 कोटींचा भुर्दंड बसत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 1 जानेवारी 1992 पासून शहरातील पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आली. मनपा पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेऊन शहरातील नागरिकांना ना नफा ना तोटा तत्वावर पाणीपुरवठा करते. 100 टक्के वसुली होत नसल्याने केएमटीप्रमाणे पाणीपुरवठा विभागाही तोटय़ातच आहे. मात्र, मनपा प्रशासनाने पाणी चोरी, गळती रोखली तर हा विभाग फायदात येऊ शकतो. मात्र, प्रशासनाकडून असे होत नाही. मनपाचे बालिंगा, नागदेववाडी आणि शिंगणापूर येथे उपसा केंद्र आहेत. येथून पाणी उपसा करून महापालिका शहराला पाणीपुरवठा करते. तीन उपसा केंद्रातून रोज 140 एमएलडी पाण्याचा उपसा होतो. परंतू 65 ते 70 एमएलडीचेच बिलिंग होते. तब्बल 70 एमएलडी पाण्याचे बिलिंग होत नसून यामध्ये पाणी गळती, पाणी चोरीचा समावेश आहे. शिंगणापूर येथे कोल्हापूर महापालिकेच्या पाणी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर पाणी चोरी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

महावितरणवर सर्वाधिक 15 कोटींचा खर्च वाया

दहा हजार लिटर पाण्यासाठी महापालिका पाटबंधारे विभागाला 6 रूपये देते. मनपाला वर्षाला एकूण 7 कोटींची पाणीपट्टी पाटबंधारे विभागाला द्यावी लागती. याचबरोबर उपसासाठी महावितरणचे वर्षाला 31 कोटी बिल येते. तसेच जलशुद्धीकरणासह इतर खर्च असा वर्षाला 38 कोटींचा खर्च आहे. रोज 65 ते 70 एमएलडी पाणी बिलिंग शिवाय होत असल्याने वर्षाला सुमारे 19 कोटींचा फटका बसत आहे.

पाणी चोरी, गळतीसाठी हे करणे आवश्यक

पाणी चोरांना शोधण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करणे.
औद्यागिक, व्यावसायिक कनेक्शनचे क्रॉस चेकींग करणे
30 ते 40 वर्षापूर्वीच्या सर्व गळक्या मुख्यपाईप लाईन नव्याने टाकणे.
पाणी चोरांना वचक बसण्यासाठी कडक कारवाई करणे.

पाणी वाया जाण्याची प्रमुख कारणे

विना मीटर कनेक्शन
फिल्टर हाऊसमधील गळती
शहरातील जुन्या पाईपलाईनमधील गळती
मीटर बंद दाखवून जादा पाण्याचा वापर करणे.
जुन्या पाण्याच्या टाक्यातील गळती

दसऱ्यानंतर पाणी चोर शोध मोहीम राबविणार

दसऱयानंतर विशेष मोहीम राबवून पाणी चोरी करणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यामध्ये मीटरच्या अगोदर पाईप लावून पाणी घेणाऱयांचाही समावेश असेल. तसेच उपसा केंद्र ते शहरातील नागरिकांच्या नळ कनेक्शन यामध्ये होणारी गळतीचा शोधही घेतला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली जाईल.
हर्षजित घाटगे, जल अभियंता

मग मनपाची यंत्रणा काय करते

पाणी चोरी शोधण्याची जबाबदारी मनपा पाणीपुरवठा विभागाची असताना मंगळवारी सामाजिक संघटनेचे ऍड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई यांनी शिंगणापूर येथे पाणी चोरींचा पर्दापाश केला. मग महापालिकेची यंत्रणा काय करते, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Stories

लॉकडाऊन नतंर शाहूवाडी विभागाचे निर्भया पथक कार्यरत : सर्वत्र गस्त सुरू

Archana Banage

चिमासाहेब जगदाळे फाऊंडेशन कोविड सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Archana Banage

सातार्डे येथे महिला पोलीस पाटीलला मारहाण ; सहा जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage

हाथरस नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी

Archana Banage

Kolhapur : कोरोनामुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य द्या

Abhijeet Khandekar

राधानगरीचा दरवाजा उघडला; घाबरू नका, मात्र सतर्क रहा – जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar