आतापर्यंत 159 इंच नोंद, 61 नंतर प्रथमच रेकॉर्ड!
प्रतिनिधी/ पणजी
मुसळधार पावसाने 1961 नंतर प्रथमच रेकॉर्ड केला असून हा विक्रम देखील मोडण्याच्या स्थितीत गोवा आहे. मौसमातील सर्वाधिक पावसाची नोंद ही 21 सप्टेंबर रोजी झाली. सरांसरी राज्यात 132.7 मि.मी म्हणजेच 5 इंच पाऊस झाला. सरांसरीच्या तुलनेत 45 इंच जादा पाऊस झाला असून अनेक वर्षांचे रेकॉर्ड यंदाच्या पावसाने मोडले आहेत. अद्याप अधिकृत पावसाचा मौसम संपण्यास 8 दिवस बाकी आहेत. पेडणेत इंचांचे द्विशतक गाठण्यासाठी आता केवळ 8 इंच पावसाची गरज आहे. अलिकडल्या काळात 200 इंच गाठणारे पेडणे हे पहिले केंद्र ठरणार आहे
राज्यात 22 सप्टेंबर रोजी स. 8.30 पर्यंत व दि. 21 सप्टेंबर पासून 24 तासात सर्वत्र विक्रमी पावसाची नोंद झाली. मुरगावात 8 इंच तर पणजीत 7 इंच एवढा जोरदार पाऊस झाला. 21 रोजी संपूर्ण दिवसभर पावसाने गोव्याला झोडपून काढून जनजीवन विस्कळीत केले होते. यंदाच्याच मोसमात असे नव्हे तर गेल्या 10 वर्षांतील रेकॉर्ड पावसाने यंदा प्रथमच मोडला आहे. संपूर्ण गोव्यात सरांसरी 5 इंच एवढा पाऊस हा सोमवारी कोसळला. यंदाचा पाऊस हा अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारा ठरणार आहे. हवामान खात्याने नव्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पेडणे द्विशतकाच्या उंबरठय़ावर
पेडणेत सोमवारी सकाळी पासून मंगळवारी सकाळपर्यंत 5 इंच पावसाची नोंद झाल्यानंतर यंदाच्या मोसमात आतापर्यंत पेडणेत पडलेल्या पावसाची नोंद आता 4868 मि. मी. एवढी झाली आहे. अर्थात 191 इंच 46 मि. मी. एवढा पाऊस झालेला आहे. द्विशतक गाठण्यास आता केवळ 8 इंच पुरेसे आहेत. गेल्या काही वर्षात गोव्यात कोणत्याही केंद्रावर एवढय़ा विक्रमी पावसाची नोंद झालेली नाही.
यंदाच्या मोसमात दि. 22 सप्टेंबर पर्यंत एकूण 4031.3 मिमी म्हणजेच 159 इंच पाऊस झालेला आहे. वार्षिक सरांसरीमध्ये आजच्या घडीला 2904 मि.मी अर्थात 114.33 इंच एवढा पाऊस पडत असतो. यंदा 45 इंच जादा पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. उत्तर गोव्यात 4186 मि.मी 165 इंच तर दक्षिण गोव्यात 3892 मि.मी. 153 इंच एवढा पाऊस झालेला आहे. उत्तर गोव्यात 40 टक्के जादा तर दक्षिणेत 38 टक्के जादा पाऊस झालेला आहे. एकंदर गोव्यात 39 टक्के जादा पाऊस पडला.
मान्सून अद्याप आक्रमकच
मान्सून गोव्यात अद्याप आक्रमकच आहे. आज दि. 23 व उद्या 24 रोजी गोव्यात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाबरोबर जोरदार वादळी वारेही वाहतील असे कळविले आहे. पणजीत सोमवारी 173.3 मि.मी एवढी विक्रमी नोंद झाली.
1961 नंतर प्रथमच गोवा विक्रम मोडण्याच्या स्थितीत
पणजी वेधशाळेचे विद्यमान कार्यसंचालक राहूल मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1961 मध्ये प्रथमच गोव्यात 408 सें.मी. म्हणजेच 160 इंच पाऊस झाला होता. यंदा गोव्याने 159 इंचांचे उद्दीष्ट पूर्ण केले व 61 नंतर प्रथमच हा दुसरा रेकॉर्ड ठरला आहे. मात्र मौसम संपुष्टात येण्यास 8 दिवस शिल्लक असल्याने गोवा यंदा नवा विक्रम करण्यास आता सज्ज झालेला आहे.
आजपासून पावसाचा वेग थोडा मंदावरणार. काही भागात जोरदार पाऊस पडून जाईल, असा अंदाज राहूल मोहन यांनी व्यक्त केला.
गेल्या 24 तासात पडलेला पाऊस
मुरगाव – 8 इंच, पणजी, दाबोळी – 7 इंच, पेडणे – 5 इंच, फोंडा, मडगाव, म्हापसा, जुने गोवे प्रत्येकी जवळपास 5 इंच, सांखळी, वाळपई, काणकोण, केपे व सांगे प्रत्येकी 4.50 इंच अशी नोंद झाली आहे. र्ं