3000 चिनी सैनिकांना वरचढ ठरले होते 125 भारतीय , वेब सीरिजमध्ये दिसणार लढाईची न ऐकलेली कहाणी
वेब सीरिज ‘1962 : द वॉर इन द हिल्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजचे 10 भाग चारुदत्त आचार्य यांनी लिहिले असून याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. त्यांनी युद्धाचे सुंदरपणे चित्रण करत सैनिकांचे वैयक्तिक जीवन आणि देशासाठीचे त्यांचे बलिदानही दर्शविले आहे. अभय देओल यात मेजर सूरज सिंग यांची व्यक्तिरेखा साकारत असून जे ‘सी कंपनी’ नावाच्या एका बटालियनचे नेतृत्व करत असतात. या सीरिजमध्ये आकाश ठोसर, सुमीत व्यास, रोहन गंडोत्रा, अनूप सोनी, मियांग चेंग, माही गिल, रोशेल राव इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
सुमारे 60 वर्षांपूवीं सैनिकांनी भारताचा अविभाज्य हिस्सा लडाखच्या रक्षणासाठी अद्भूत साहस अन् शौर्याची प्रचिती दाखवून दिली होती. 3000 चिनी सैनिकांचा हिमतीने सामना करणाऱया 125 भारतीय सैनिकांची ही कहाणी आहे. त्यांच्या साहसाने या लढाईची कथाच बदलली होती.
तुलनेत सामान्य युद्धसामग्री असूनही स्वतःपेक्षा अधिक संख्येत असलेल्या शत्रूच्या सैनिकांना स्वतःच्या सीमेत घुसखोरी करण्यापासून रोखलेल्या सैनिकांची ही कथा आहे. सैन्याच्या इतिहासातील सर्वात महान लढतींपैकी एक लढत आहे.
विश्वप्रसिद्ध ऍक्शन कोरियोग्राफर डॉन ली यांनी या सीरिजमध्ये सर्व ऍक्शन दृश्यांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी सीरिजमध्ये प्रत्येक सैनिकाच्या लढाईची पद्धत अद्वितीय स्वरुपात दर्शविली आहे. डॉन ली यांनी यापूर्वी पायरेट्स ऑफ कॅरेबियन, स्टार ट्रेक इत्यादींचे दिग्दर्शन केले आहे. ही सीरिज लडाख आणि सीमेवरील दुर्गम गावांमध्ये चित्रित करण्यात आल्याने ती वास्तविक वाटणार आहे.