प्रतिनिधी /पणजी
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून गोवा छायापत्रकार संघटनेतर्फे दिग्गज छायाचित्रकारांना या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या दि. 19 रोजी संघटनेचा 15 वा वर्धापनदिन असून प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10.30 वाजता पणजीतील डॉन बॉस्को स्कूलसमोर सरकारी गॅरेज परिसरात संघटनेच्या नूतन कार्यालयात हा सोहळा होणार असून राजन (बाबुश) गोलतकर आणि नारायण दिवकर या छायाचित्रकारांचा सन्मान तसेच संघटनेच्या आर्ट गॅलरीचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, साबांखामंत्री नीलेश काब्राल यांचीही उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मान्यवरांच्याहस्ते शालेय आणि सामान्य श्रेणीतील राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल, तसेच 20 पेक्षा जास्त पत्रकार छायाचित्रकार आर्ट गॅलरीत त्यांचे बातम्यांशी संबंधित फोटो प्रदर्शित करणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष तुळशीदास राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.