‘भारत बायोटेक’च्या प्रयत्नांना यश मिळण्याचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा लहान मुलांनाही फटका बसत चालला आहे. या वाढत्या धोक्यामुळे आता भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी तज्ञ समितीने शिफारस केली आहे. दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर चाचण्या यशस्वी ठरल्यास येत्या काही दिवसात कोरोना महामारीविरोधातील या लढाईत मुलांसाठीही लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत.
भारत बायोटेकने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचे आकलन करण्यासाठी कोव्हॅक्सिन डोसच्या दुसऱया व तिसऱया टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. भारत बायोटेकच्या विनंतीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओच्या कोविड-19 विषयक तज्ञ समितीने विचारविनिमय केला. त्यानंतर प्रस्तावित चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस समितीने केल्याचे समजते. या शिफारशींना अंतिम मंजुरी मिळाल्यास विविध ठिकाणच्या ‘एम्स’ रुग्णालयांसह देशात विविध ठिकाणी ही चाचणी होऊ शकते. महाराष्ट्रात नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिटय़ूटमध्येही ही चाचणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सावधगिरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच मुलांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही अधिक असेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता लहान मुलांसाठी लसनिर्मिती करण्याची तयारीही विविध कंपन्यांकडून सुरू आहे. ‘भारत बायोटेक’ने या मोहिमेमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठय़ा प्रमाणात असतील, ही तज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील कोरोना उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.