भारतीय सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळला : पाक सैन्याची एक इमारत नष्ट
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराच्या आडून नियंत्रण रेषेवर दोन ठिकाणी दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा मोठा प्रयत्न केला होता. उत्तर काश्मीरमध्ये केरन आणि मच्छल सेक्टर तसेच राजौरीच्या कलाल सेक्टरमध्ये झालेल्या या आगळिकीला भारतीय सैनिकांना शौर्याने उधळून लावले आहे. भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत 2 दहशतवादी आणि एक पाकिस्तानी सैनिक मारला गेला आहे. तर 2 पाकिस्तानी सैनिक आणि 1 दहशतवादी जखमी झाल्याचे समजते. पाकिस्तानी सैन्याची एक इमारतही जमीनदोस्त झाली आहे.
कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर कुलाडी भागात गस्त घालणाऱया गोरखा रेजिमेंटच्या सैनिकांनी घुसखोरीचा होणारा प्रयत्न पाहताच कारवाई केली आहे. तारेच्या कुंपणानजीक दहशतवादी पोहोचताच सैनिकांनी त्यांना शस्त्रs खाली ठेवण्याचा इशारा दिला. परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करत पलायनाचा प्रयत्न केला. यावर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिल्याने दहशतवाद्यांनी पळ काढला. घुसखोरीस अपयश आल्याने पाकिस्तानी सैनिकांनी मच्छल आणि गुगलडारा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला.
भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याची एक इमारत नष्ट झाली आहे. तसेच एक पाकिस्तानी सैनिक मारला गेला आहे. कलाल सेक्टर ओलांडून घुसखोरी करू पाहणाऱया 5 दहशतवाद्यांपैकी एक भूसुरुंग स्फोटात मारला गेला आहे. हे 5 ही दहशतवादी आत्मघाती हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती समोर आली आहे.