केवळ 2 वर्षांच्या मुलीचा आयक्यू (बुद्धय़ांक) जाणून तुम्ही थक्क व्हाल. मेन्साची सदस्य होणारी ही सर्वात कमी वयाची अमेरिकन ठरली आहे. मेन्साचे सदस्यत्व याच्या निर्धारित इंटेलिजेन्स टेस्टमध्ये 98 टक्के गुण प्राप्त करणाऱयांनाच प्राप्त होते.
या टेस्टमध्ये बाजी मारणारी अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमधील काशे क्वेट वयाने लहान असली तरीही तिची आयक्यू लेव्हल भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावते. काशेचा आयक्यू लेव्हर 146 इतका आहे. काशे अमेरिकेतील सर्व 50 प्रांतांची नावे आणि ओळख अत्यंत सहजपणे करते. काशे नेहमीच कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक भोवतालचा शोध घेणे आणि प्रश्न विचारत असते असे तिचे वडिल डेवोन अठवाल यांनी सांगितले आहे.
जर तिला काही समजले नाही तर संबंधित गोष्ट काय आहे आणि ती कशाप्रकारे कार्य करते हे जाणून घेऊ पाहते. एकदा त्याची माहिती मिळाल्यावर ती तोंडपाठ करते असेही त्यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन बॅरिस्टर रलँड बेरिल आणि लॅन्सलॉट लियोनेल वेयर यांच्याकडून मेन्साची स्थापना इंग्लंडमध्ये ऑक्सफोर्डच्या लिंकन कॉलेजमध्ये 1946 मध्ये करण्यात आली होती. मेन्सचे सदस्य स्थानिक स्तरावर बैठकांमध्ये भाग घेऊ शकतात. या संघटनेकडे सर्वात चांगले आणि प्रतिभावंतांचे नेटवर्क आहे. मेन्साचा सर्वात कमी वयाचा सदस्य 28 महिन्यांचा मुहम्मद हारीज नादजिम असून तो ब्रिटनमध्ये राहतो, त्याचा आयक्यू 142 आहे. मेन्साचा सदस्य होण्यासाठी स्टॅनफोर्ड-बिनेट इंटेलिजेन्स स्केल किंवा कॅटेल कल्चर फेयर इंटेलिजेन्स टेस्ट यासाख्या विशेष मान्यताप्राप्त आयक्यू चाचण्यांमध्ये 98 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतात.