निवडणुकीनंतर नेत्यांकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याची तक्रार सर्वत्रच दिसून येते. पण तामिळनाडूच्या कुंभकोणममध्ये काही मतदारांना मतदानाच्या दुसऱया दिवशीच समजले की त्यांना मताच्या बदल्यात 2 हजार रुपये किंवा तितक्याच किमतीच्या सामानाच्या नावाखाली गंडविण्यात आले आहे. मतदारांना याकरता रितसर टोकनही देण्यात आले होते.
या सर्व प्रकारात कुंभकोणममध्ये एका दुकानदाराला स्वतःचे दुकान बंद करणे भाग पडले आहे. या दुकानात लोक टोकन घेऊन येत 2000 रुपये रोख किंवा तितक्याच किमतीचे सामान मागत होते.
कुंभकोणमच्या बत्राचरियार मार्गावर शेख मोहम्मद यांचे दुकान असून यात घरगुती वापराच्या सामग्रीची विक्री होते. बुधवारी या दुकाना मोठय़ा संख्येत लोक टोकन घेऊन पोहोचले. या टोकनवर शेख मोहम्मद यांच्या दुकानाचे नाव आणि पत्ता छापला गेला होता. या लोकांनी शेख मोहम्मद यांच्यावरच दोन हजार रुपये किंवा तितक्याच किमतीचे सामान देण्यासाठी दबाव आणला होता.
ही टोकन्स कुणी दिली हे सांगण्यास मात्र काही लोकांनी टाळाटाळ केली आहे. तर कुंभकोणममधून निवडणूक लढविणाऱया एका उमेदवाराच्या पथकाकडून टोकन्स मिळाली असल्याचे काही जणांनी सांगितले. टोकनसह येणाऱया लोकांची संख्या प्रचंड वाढू लागल्यावर शेख मोहम्मद यांना स्वतःचे दुकान काही काळासाठी बंद करावे लागले आहे.
ज्यांनी टोकन दिले आहे, त्यांच्याकडूनच पैसे घ्या असे मी लोकांना सुनावले आहे. या टोकनशी कुठलेच देणेघेणे नसल्याचा फलकही मला लावावा लागल्याचे शेख मोहम्मद यांनी म्हटले आहे. या टोकन घोटाळय़ाप्रकरणी एएमएमके उमेदवार कनागराज यांच्या विरोधात निवडणुकीवेळी मतदारांना मतांच्या बदल्यात पैसे किंवा सामानाचे टोकन देण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.