विनातिकीट करत होता प्रवास, पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / काणकोण
मुंबई ते मंगळूर मार्गावर कोकण रेल्वेने प्रवास करणाऱया एका व्यक्तीकडून कारवारच्या कोकण रेल्वे पोलिसांनी 2 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सदर इसम मुंबईहून आला होता आणि मंगळूरला जात होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्ती इतकी मोठी रक्कम घेऊन विनातिकीट प्रवास करत होती. 2 कोटींची रक्कम सापडल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
संशयास्पदरित्या बॅग घेऊन जाणाऱया सदर इसमाला पोलिसांनी बॅग उघडण्यास सांगितल्यानंतर सदर इसमाने आधी नकार दिला. मात्र पोलिसांनी ज्यावेळी बॅग उघडली त्यावेळी त्यात 2 कोटींची मोठी रक्कम आढळली. ही रक्कम आपण मंगळूर येथील एका व्यक्तीला देण्यासाठी मुंबईहून आलो असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले. सदर इसम मूळ राजस्थान येथील असून त्याचे वय 22 इतके असल्याचे दिसून आले.
रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून संशयिताला अटक केली व त्यानंतर त्याला व जप्त केलेली पैशांची बॅग कारवार पोलिसांच्या स्वाधीन केली, अशी माहिती कारवारचे कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक विपील सिंह राणा यांनी दिली आहे. ही मोठी रक्कम नेमकी कुणासाठी व कशासाठी नेली जात होती, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.