धर्मग्रंथासह घेतली शपथ
वृत्तसंस्था / कॅनबरा
ऑस्ट्रेलियाच्या नव्या सरकारमधील मंत्र्यांची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात मोठय़ा संख्येत महिलांना सामील करण्यात आले आहे. 23 सदस्यीय मंत्रिमंडळात एकूण 10 महिलांना स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मुस्लिमांना स्थान देत ऐनी एली आणि एड ह्यूसिक यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिमंडळात दोन मुस्लिमांच्या नियुक्तीला ऑस्ट्रेलियात प्रतिकात्मक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. एड ह्यूसिक आणि ऐनी एली मंत्रिमंडळातील स्वतःच्या नियुक्तीला ऐतिहासिक ठरवत आहेत.
ह्युसिक यांना ऑस्ट्रेलियाच्या उद्योग आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. तर एली याना शिक्षण आणि युवा मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा हिस्सा होणे निश्चितपणे एक जबाबदारीचे काम असून मी यात स्वतःचे सकारात्मक योगदान देणार असल्याचे ह्युसिक यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांना मंत्रिपद हे प्रतिकात्मक स्वरुपात अत्यंत महत्त्वाचे आहे. मंत्रिमंडळात मुस्लीम मंत्र्यांचा समावेश महत्त्वाचे नसल्याचे मानणाऱया लोकांनी देशाला एकत्र आणण्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे जाणून घ्यावे असे ह्युसिक यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात मुस्लिमांचा प्रवेश देशातील मुस्लिमांना एक शक्तिशाली संदेश देणार आहे. अनेकदा येथील स्थलांतरित तरुण-तरुणी आणि विशेषकरून मुलांना दुय्यम दर्जाचे मानले जात असल्याचे वाटत असावे, परंतु देशाच्या मंत्रिमंडळात मुस्लिमांना स्थान मिळाल्याने ही भावना दूर होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन्ही मंत्र्यांनी बुधवारी गव्हर्नमेंट हाउसमध्ये एका सोहळय़ात हातात धर्मग्रंथ घेत स्वतःच्या पदाची शपथ घेतली आहे.
ह्युसिक हे पश्चिम सिडनी मतदारसंघात विजयी झाले आहेत. 2010 मध्ये संसदेत निवडून आलेले ते पहिले मुस्लीम ठरले होते. बोस्नियन मुस्लीम स्थलांतरितांचे ते पुत्र आहेत. मुस्लीम असल्याचा मला गर्व आहे, परंतु मी कुठल्याही गोष्टीकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहू इच्छित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पहिल्या मुस्लीम महिला मंत्री ऐनी एली या पश्चिम ऑस्ट्रेलिया मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. इजिप्तच्या अलेक्झेंड्रिया येथे जन्मलेल्या ऐनी यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले होते. त्यांचे वडिल एक चालक होते. एनी यांनी एडिथ कोवान विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. ऑस्ट्रेलियन फेडरेशन ऑफ इस्लामिक कौन्सिल्सचे अध्यक्ष रेटब जेनिड यांनी दोन्ही मुस्लीम मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.