उत्तर कोरियाच्या हुकुमशहाचे क्रौर्य
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियातून एक थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. येथे माध्यमिक शिक्षण घेणाऱया दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना ही शिक्षा केवळ दक्षिण कोरियातील चित्रपट पाहण्यासाठी देण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे वय 15-16 वर्षांदरम्यान होते. या दोघांवरही लोकांसमोर गोळय़ा झाडण्यात आल्या आहेत. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात शत्रुत्व आहे. याचमुळे उत्तर कोरियाच्या लोकांना दक्षिण कोरियातील चित्रपट अन् शो पाहता येत नाहीत. हेसन शहरात राहणाऱया लोकांना एका मैदानात एकत्र करण्याचा आदेश उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी अधिकाऱयांना दिला होता. येथे अधिकाऱयांनी विद्यार्थ्यांवर लोकांच्या जमावासमोरच गोळय़ा झाडल्या आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्याचा आरोप होता.