गंज लागलेला खंजीर साफ करण्यास लागले 9 महिने
जर्मनीत एका विद्यार्थ्याला चांदीचा प्राचीन खंजीर सापडला आहे. हा रोमन खंजीर होता. या खंजीराला रीस्टोरेशन केल्यावर तो पूर्वीसारखा दिसू लागला आहे. ईसवी सन पहिल्या शतकात एक रोमन सैनिक हा चांदीचा खंजीर घेऊन युद्धात सामील झाला होता असे सांगण्यात येते.
मुंस्टरनजीक हाल्टर्न एमसी येथे एका प्राचीन दफनभूमीत हा खंजीर सापडला आहे. हे ठिकाण पश्चिम जर्मनीत आहे. ही दफनभूमी एका जुन्या रोमन मिलिट्री कॅम्पनजीक होती. ही दफनभूमी सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी या भागात स्थापन करण्यात आली होती आणि पुढील काळात तिचे अस्तित्व संपविण्यात आले होते. परंतु दोन शतकांपासून या भागाचे पुरातात्विक महत्त्व आहे.
19 वर्षीय विद्यार्थी निको कॅलमनने एका दरीत खोदकाम केले असता त्याला हा चांदीचा खंजीर मिळाला होता. जमिनीतून सापडलेला हा खंजीर प्रारंभी त्याला एका गंज लागलेल्या धातूच्या तुकडय़ासारखा वाटला होत. गंज चढला असला तरीही तो अस्त्रासारखा दिसत होता. या खंजीराला पूर्वस्थितीत आणण्यासाठी तज्ञांना 9 महिन्यांचा कालावधी लागला आहे.
या खंजीरात लाकडी म्यान असून याचा बेल्ट 2 हजार वर्षांनंतरही सुरक्षित आहे. खंजीरावर अत्यंत बारीक तपशीलही स्पष्ट दिसून येतो. हा खंजीर सैनिकाच्या दागिन्याप्रमाणे होतो. युद्धात वापरता येईल अशाप्रकारे तो तयार करण्यात आला होता. तज्ञांनुसार या खंजीराचा युद्धात वापर करण्यात आला असावा. चांदीच्या या खंजीराचा शोध एक दुर्लभ अन् अनोखा शोध आहे. या खंजीरामुळे अनेक महत्त्वाची माहिती मिळते. या शोधामुळे 2 हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या या क्षेत्रात नेमके काय घडले हे पुरातत्वतज्ञांना समजू शकणार आहे.