कोरोनाबद्दल समजल्यावर केले हे काम
शहरातील धावपळीपासून दूर शांत जीवन जगण्याचे काही लोकांचे स्वप्न आहे. पण कुटुंब, नातलग आणि मित्रांना सोडून एकटे जगणे आव्हानात्मक असते. पण एका व्यक्तीने हे आव्हान स्वीकारले आणि मागील 20 वर्षांपासून तो एका गुहेत एकटाच राहत आहे. पण एक दिवस तो स्वतःच्या शहरात परतला तेव्हा त्याला सर्वांच्या चेहऱयावर मास्क असल्याचे आढळून आले. हे त्याच्यासाठी विचित्र होते, कारण त्याने ‘कोरोना’बद्दल कधीच ऐकले नव्हते. पण कोरोना विषाणूबद्दल कळताच या व्यक्तीने वेळ न दवडता त्वरित लस घेतली आहे.
सोशल डिस्टन्सिंग किंग
ही कहाणी 70 वर्षीय पेंटा पर्ट्रोविक यांची असून त्यांना जग सोशल डिस्टन्सिंग किंग या नावाने ओळखू लागले आहे. ते मागील 20 वर्षांपासून दक्षिण सर्बियाच्या स्टारा प्लानिना येथील पर्वतांवरील एका गुहेत राहत होते. यामुळे ते 20 वर्षांपासून मुख्य प्रवाहातील समाजापासून दूर झाले होते.


स्वातंत्र्य अन् शांतता
पेंटा पर्ट्रोविक यांनी 2 दशकांपूर्वी स्वतःला मुख्य प्रवाहातील समाजापासून वेगळे केले होते. त्यावेळी त्यांचे वय 50 वर्षे होते. जीवनातील धावपळीला ते वैतागले होते. स्वातंत्र्य आणि शांततेसाठी ते शहरानजीकच्या स्टोरा प्लानिका येथील पर्वतांवरील एका गुहेत राहू लागले होते. मागील वर्षी ते शहरात परतले तेव्हा जग कोरोना नावाच्या महामारीला तोंड देत असल्याचे कळले.
लस घेण्याचे आवाहन
त्यानंतर संधी मिळताच त्यांनी कोरोनापासून बचावाची लस घेतली आहे. जर मी लस घेतली नसती तर माझ्या गुहेपर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला असता. लस घेण्यास लोक टाळाटाळ का करत आहेत हेच मला उमगलेले नाही. मी एका अतिरिक्त डोससह स्वतःचे तिन्ही डोस घेणार आहे. प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
पेंटा यांच्या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी उभी चढाई करावी लागते. या गुहेत एक गंज लागलेला जुना बाथटब आहे. ज्याचा वापर ते टॉयलेटप्रमाणे करतात. बेंच आणि गवताचा ढिग त्यांचा बेड ठरतो. गुहेत येण्यापूर्वी पेंटा यांनी स्वतःची बचत दान केली होती.