वार्ताहर/ एकसंबा
कुरुंदवाडहून एकसंब्याकडे येणाऱया वाहनातून 20 लाख रुपये जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री कुरुंदवाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू असताना भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. चारचाकी वाहनासह चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी तपास सुरू आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, महाराष्ट्रात शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सलीम सनदी (रा. मिरज) हा आपल्या मारुती सुझुकी स्विफ्ट (एम.एच 02 बी.वाय 860) मधून 20 लाख रुपये रक्कम घेऊन एकसंब्याकडे (ता. चिकोडी) येत असताना कुरुंदवाड येथील शिवतिर्थाजवळ वाहनाची तपासणी केली. दरम्यान या वाहनामध्ये 20 लाख रुपयाची रोकड मिळून आली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत 100 व 500 भारतीय चलनातील नोटांचे पोते मिळून आले.
पोलिसांनी चार चाकी वाहनासह सलीम अमीन सनदी, मुस्तफा मेहबूब सनदी, दावल हुसेन चौधरी, गणेश मारुती पवार (सर्व रा. मिरज. जि. सांगली) या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता सलीम सनदी हा मसाला विपेता व्यापारी शेतकऱयांना आगाऊ रक्कम देण्यासाठी तसेच हळदी व मसाले खरेदीसाठी एकसंब्याकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पदवीधर शिक्षक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथक प्रमुख फिरोज ऐतवडे, हेमंत जाधव, अजित कुरणे यांनी शिरोळ कोषागार कार्यालयात सदरची रक्कम जमा केली आहे.
कुरुंदवाड पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईत 20 लाख रुपयाची रोकड मिळून आली आहे. पण सदरची रक्कम सलीम सनदी हे व्यवसायासाठी एकसंब्याकडेच घेऊन येत होते की, निवडणुकीसाठी याबाबतचा तपास सुरू आहे. सलीम सनदी यांनी जरी एकसंब्याकडे जात असल्याचे कारण सांगितले असले तरी उर्वरित तिघा संशयितांच्या चौकशीनंतर खरे काय ते स्पष्ट होणार आहे.