वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ जगभरात नाव कमावून आहे. जमीन, आकाश, पाणी किंवा खोल समुद्रातूनही शत्रूला लक्ष्य करणारे हे क्षेपणास्त्र आहे. 12 जून 2001 रोजी क्षेपणास्त्राने स्वतःचे पहिले टेस्ट उड्डाण केले होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि रशियाच्या संस्थेने मिळून याची निर्मिती केली आहे. डीआरडीओने ब्राह्मोस क्षेपणास्त्राला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष संदेश प्रसारित केला आहे.
ब्राह आणि मोस या दोन हिस्स्यांनी ब्राह्मोस हे नाव निर्माण झाले आहे. ब्राह म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदी आणि मोस म्हणजे रशियातील मोस्कवा नदी आहे. ब्राह्मोस हे जगातील सर्वात वेगवान युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र आहे. याचा कमाल वेग 4,300 किलोमीटर प्रतितासापेक्षाही अधिक आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत पोर्टेबल असल्याने ते डागणे सोपे आहे. याच्या अनेक नव्या स्वरुपांवर भारत आणि रशिया मिळून काम करत आहेत.
ब्राह्मोस 21 व्या शतकातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. हे क्षेपणास्त्र 4000 किलोमीटरच्या मारक पल्ल्यापर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. लपून बसलेल्या लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी हे क्षेपणास्त्र सर्वात विश्वासार्ह मानले जाते. दोन वर्षांपूर्वी भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांना सीमेवर तैनात केल्यावर पाकिस्तान हादरून गेला होता. पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे याबाबत पत्र लिहिले होते.