70 वर्षीय वांग यांना ‘सुपर ग्रॅनी’ मिळाले नाव
मागील दोन दशकांमध्ये 100 मॅराथॉन पूर्ण करणाऱया चिनी महिलेचे वय 70 वर्षे आहे. या महिलेला लोक आता ‘सुपर ग्रॅनी’ म्हणू लागले आहेत. या महिलेचे नाव वांग-लांग आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी धावण्यास प्रारंभ केला. धावणे हीच आपली आवड असल्याचे त्यांना जाणवले. 2004 मध्ये त्यांनी पहिली मॅराथॉन जिंकली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 100 मॅराथॉन पूर्ण केल्या आहेत.
यंदा वांग यांनी नवा विक्रम प्रस्थापित करत 40 तासांमध्ये 168 किलोमीटर लांबीची लियोनिंग मॅराथॉन जिंकली आहे. मागील वर्षी वांग यांनी 100 किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये स्वतःच्या चांगल्या मैत्रिणीसोबत नोंदणी केली होती. पण यंदा त्यांना मॅराथॉनमध्ये मैत्रिणीशिवाय सामील व्हावे लागले आहे.
वांग प्रतिदिन 20 किलोमीटर धावण्याचा सराव करतात. रविवारी त्या लाँग डिस्टन्स रनिंग क्लबच्या अन्य सदस्यांसोबत धावतात. वांग यांना गिर्यारोहणाचीही आवड आहे. या वृद्ध महिलेने टेशन इंटरनॅशनल माउंटनियरिंग फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला हजारो स्पर्धकांमध्ये 27 वा क्रमांक पटकाविला होता. वय केवळ एक आकडा आहे. भविष्यातही अशाचप्रकारे मॅराथॉन जिंकू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.