काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये उत्तर भागातील एका मशिदीत झालेल्या स्फोटात 20 जण ठार झाले. तसेच अन्य 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून गुरुवारी देण्यात आली. मात्र, तालिबानने जीवितहानीबद्दल कोणतेही विधान जारी केलेले नाही. तसेच कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मृतांमध्ये अमीर मोहम्मद काबुली नावाच्या सर्वोच्च इस्लामिक धर्मगुरूचा समावेश आहे.
खैर खाना परिसरातील एका मशिदीत नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. गेल्या काही दिवसात झालेला हा सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे सांगण्यात आले. दोन आठवडय़ांपूर्वी काबूलमध्ये झालेल्या दोन प्राणघातक बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर 40 जण जखमी झाले होते. दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीला एक वर्ष पूर्ण होत असताना हा स्फोट झाला आहे. अफगाणिस्तानवर आपले पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा सध्या तालिबानकडून केला जात आहे. परंतु इस्लामिक स्टेट देशभरातील नागरिक आणि पोलिसांवर हल्ले करत कुरापती काढण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे देशात बऱयाचदा तणावाची स्थिती निर्माण झालेली दिसते.
गेल्यावषी ऑगस्टमध्ये काबूल ताब्यात घेतल्यानंतर इस्लामिक अधिकाऱयांनी महिला आणि मुलींच्या हक्कांवर कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच प्रसारमाध्यमांवरही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तालिबानविरोधात आवाज उठवणाऱयांवर अत्याचार आणि शिक्षेला सामोरे जावे लागत आहे. तालिबानच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे मोठय़ा प्रमाणावर निषेध केला जात आहे.