हॅकर्सची दिल्ली एम्सकडे मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय एम्स दिल्लीचा सर्व्हर हॅक करणाऱया गुन्हेगारांनी 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. हॅकर्सनी ही रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे देण्यास सांगितले आहे. एम्सचा सर्व्हर बुधवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी रॅन्समवेअर अटॅक करून हॅक करण्यात आला होता. या हॅकिंगमुळे रुग्णालयाच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत.
रुग्णालयाचे ओपीडी अन् आयपीडीत येणाऱया रुग्णांवर उपचार करण्यास या हॅकिंगमुळे समस्या निर्माण होत आहे. सर्व्हर ठप्प झाल्याने ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अन् टेलिकन्सल्टेशन यासारख्या डिजिटल सेवा देखील प्रभावित झाल्या. परंतु या सर्व सेवा आता मॅन्युअल स्वरुपात चालविल्या जात आहेत.
आंतरराष्ट्रीय कनेक्शन
डाटा हॅकमध्ये इंटरनॅशनल सायबर क्राइमचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार सायबर दहशतवादाशी निगडित असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. यासंबंधी गुरुवारी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दिल्ली एम्सचा सर्व्हर बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून डाउन आहे, हा सर्व्हर सुमारे 48 तासांनंतरही पूर्ववत करता आला नव्हता. यामुळे रुग्णालयात रुग्णांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य होत नव्हते.
देशात दर महिन्याला 3 लाख सायबर हल्ले
भारतात दर महिन्याला आरोग्य सेवाक्षेत्रावर सुमारे 3 लाख सायबर हल्ले होतात. जगभरात हे प्रमाण दुसऱया क्रमांकाचे आहे. अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रावर दर महिन्याला सुमारे 5 लाख सायबर हल्ले होत असतात. हॅकर्स स्वतःच्या रॅन्समवेअरला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याठी बॉटनेट मालवेअर आणि अन्य रिमोट ऍक्सेस ट्रोजनसमवेत अनेक पद्धतींचा वापर करत आहेत.