काश्मीर खोऱयात सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेच्या 200 कोटी रुपयांच्या 40 हून अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या संस्थेवर कारवाईची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या संघटनेच्या काश्मीर खोऱयात अजून 120 मालमत्ता असून त्यांची किंमत अंदाजे 800 कोटी रुपये आहे. या सर्व मालमत्ता सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत. यापुढेही या मालमत्तांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
‘जमात-ए-इस्लामी’सोबतच हिजबुल नेत्यांच्या मालमत्तेवर येत्या काही दिवसांत कारवाई केली जाऊ शकते. त्यांच्या अनेक मालमत्ता श्रीनगर आणि अनंतनागमध्ये आहेत. याशिवाय हुर्रियतच्या इतर नेत्यांच्या मालमत्तेवर लवकरच कारवाई केली जाईल, असेही सांगितले जात आहे. यापूर्वी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या श्रीनगरमध्ये असलेल्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली होती.
इस्लामिक संघटनेचा खोऱयात मोठा प्रभाव
जमात-ए-इस्लामीची स्थापना 1941 मध्ये इस्लामिक-राजकीय संघटना आणि सामाजिक रुढीवादी चळवळ म्हणून झाली होती. इस्लामिक आलिम आणि सामाजिक-राजकीय तत्वज्ञानी अबुल आला मौदुदी यांनी याची स्थापना केली होती. जमात-ए-इस्लामी ही इस्लामच्या आधुनिक संकल्पनेवर आधारित विचारधारा तयार करणारी पहिली संघटना होती. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर ही संघटना भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन स्वतंत्र संघटनांमध्ये विभागली गेली. त्यांना अनुक्रमे जमात-ए-इस्लामी हिंद आणि जमात-ए-इस्लामी पाकिस्तान असे नाव देण्यात आले होते.