Tarun Bharat

सत्तेत आल्यास 200 युनिट वीज मोफत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची घोषणा : काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेला प्रारंभ : भाजपकडून आश्वासनांची पूर्तता नाहीच

प्रतिनिधी /बेळगाव

महात्मा गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले बेळगाव हे पवित्र ठिकाण आहे. म्हणून वीरसौधपासून प्रजाध्वनी यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या पुण्यभूमीवरील विहिरीच्या पाण्याने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. निवडणुकीत भ्रष्ट सरकारचा नायनाट करण्यासाठी ही मोहीम असल्याचे सांगत काँग्रेस सत्तेवर आल्यास 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली.

कर्नाटकातील भाजप सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे. मुळात भाजप इतके खोटारडे राजकारणी आजवरच्या इतिहासात आम्ही कधीच पाहिले नाहीत. भाजप सरकार म्हणजे बनावटांची फॅक्टरी आहे. खोटारडेपणा हेच त्यांचे मोठे भांडवल आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी बेळगाव येथे केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 11 जानेवारीपासून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची संयुक्त रथयात्रा प्रजाध्वनीला बेळगाव येथून सुरुवात झाली. सायंकाळी ऑटोनगर येथे झालेल्या जाहीर सभेत सिद्धरामय्या यांनी भाजपवर आरोप केले.

यावेळी पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते डी. के. हरिप्रसाद, विधानसभेतील उपनेते यु. टी. खादर, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, सलीम अहमद, फिरोज सेठ, राजू सेठ, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार डॉ. अंजली निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदींसह जिल्हा व राज्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेतला होता.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले, गेल्या निवडणुकीवेळी भाजपने 600 आश्वासने दिली होती. यापैकी 50 ते 60 आश्वासनांचीही पूर्तता झालेली नाही. सत्तेवर आल्यानंतर एक लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. पाणी योजनांसाठी 1 लाख 50 हजार कोटी रुपये खर्च करण्याचे जाहीर केले होते. या पाच वर्षांत केवळ 45 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. लोकांच्या मनात स्वप्न व आशा निर्माण करून त्यांची घोर निराशा केल्याचा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला आहे.

सूरजेवालांचे टक्के अन् टोणपे!

यावेळी पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला म्हणाले, बसवराज बोम्माई सरकार 40 टक्के कमिशनचे सरकार आहे. प्रत्येक कामासाठी लाच द्यावेत लागत आहे. बेळगाव येथील कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्या करावी लागली. 40 टक्के लाच देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळेच त्यांनी जीव दिला. आम्ही 40 टक्के कमिशन देतो, त्यांचा जीव परत येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत सरकारविरुद्ध त्यांनी टीकेची झोड उठविली. कर्नाटकात पोलीस निरीक्षक व विद्यापीठांच्या कुलगुरुपदांची विक्री सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

मराठी विद्यानिकेतनतर्फे दहावी व्याख्यानमालेला प्रारंभ

Amit Kulkarni

कोंबडी बाजार भंगीबोळातील पार्किंगमुळे व्यावसायिक त्रस्त

Amit Kulkarni

खानापूर तालुका क्रीडांगणाची दूरवस्था

Amit Kulkarni

बिबटय़ा नैसर्गिक अधिवासात गेला असावा?

Amit Kulkarni

म्हैसूर विद्यापीठाची के-सेट 21 जून रोजी

Patil_p

आम्हाला संरक्षण द्या, आशा कार्यकर्त्यांचे निवेदन

Patil_p