रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी प्रसिद्ध
मुंबई / वृत्तसंस्था
गेल्या 2 वर्षांमध्ये रिझर्व्ह बँकेने 2000 रूपयांच्या नव्या नोटा छापलेल्या नाहीत, अशी माहिती बँकने दिली आहे. यामुळे या नोटा चलनातून काढून टाकल्या जाणार का ? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र बँकेने तसे काही होणार नसल्याचे स्पष्ट करत या नोटा चलनात राहतील असे ठासून म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी 2000 रूपयांच्या 336 कोटी 32 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची संख्या आता कमी होऊन 329 कोटी 10 लाख इतकी झाली. या वर्षात ती आणखी कमी होऊन 273 कोटी 98 लाख इतकी झाली. त्यामुळे मार्च 2020 मध्ये 2000 च्या नोटांची संख्या एकंदर चलनी नोटांच्या संख्येच्या 2.4 टक्के इतकीच राहिली आहे. सरकारचा भर 500 रूपयांच्या नोटा छापण्यावर आहे.
ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. मूल्याच्या दृष्टीनेही घट झाली असून आता 2000 रूपयांच्या नोटांचे एकंदर मूल्य एकंदर चलन मूल्याच्या 22.6 टक्के इतकेच राहिले आहे. मार्च 2018 मध्ये 33.4 टक्के होते. 500 रूपये आणि 200 रूपयांच्या नोटांची संख्या आणि मूल्य यांच्यात मात्र मोठी वाढ झाली असून ती यापुढेही होत राहील असे सांगण्यात आले.
500 रूपयांच्या 1200 कोटी नोटा
2019-2010 या आर्थिक वर्षात 500 रूपयांच्या 1 हजार 463 कोटी नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी 1 हजार 200 कोटी नोटा छापून त्या चलनात आणण्यात आल्या आहेत. 2018-2019 या आर्थिक वर्षात 500 रूपयांच्या 1,147 कोटी नोटा छापण्यात आल्याची माहिती अहवालात आहे.
100 आणि 50 च्याही नोटा
100 रूपयांच्या 330 कोटी, 50 रूपयांच्या 240 कोटी तर 20 रूपयांच्या 125 कोटी तर 10 रूपयांच्या 147 कोटी नोटा छापल्या गेल्या असून त्या चलनात आणण्यात आल्या आहेत, असे अहवालात सांगण्यात आले आहे.
बनावट नोटांचे प्रमाण
रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार 2 लाख 96 हजार 695 नोटा बनावट असल्याचे आढळून आले. यापैकी 4.6 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेने तर 95.4 टक्के नोटा इतर बँकांनी शोधल्या. या नोटा त्वरित चलनातून काढून टाकण्यात आल्या, असेही हा अहवाल म्हणतो.