Tarun Bharat

पोलीस कर्मचाऱयांसाठी बांधणार 20 हजार घरे

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांचे स्पष्टीकरण : प्रशिक्षणप्राप्त राखीव पोलीस दलाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती : जवानांकडून समाजसेवेची शपथ

प्रतिनिधी / बेळगाव

राज्यातील पोलीस विभाग उत्तम सेवा बजावत आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेला संरक्षण आणि न्याय देण्याचे काम अहोरात्र केले आहे. त्यामुळे त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. त्यांना राहण्यासाठी 20 हजार घरे बांधून देण्याची योजना आखण्यात आली असून सध्या 10 हजार घरे निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली.

मच्छे येथील केएसआरपी मैदानावर आयोजित पथसंचलनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, इंग्रजांनी देश सोडताना भारतीय लोक सक्षम नाहीत, ते शांतता राखण्यामध्ये अपयशी ठरतील. त्यांच्याकडे कोणतीही शिस्त नाही, असे सांगितले होते. मात्र, देशातील जनतेने सहकार्य केले. पोलिसांनीही शिस्त व प्रामाणिकपणे शांतता राखण्यास भाग पाडले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशात शांतता असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांचा आम्हाला अभिमान

संपूर्ण देशामध्ये कर्नाटकातील पोलीस विभागाने उत्तमप्रकारे सेवा बजावली आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शौर्य, धैर्य आणि संयम दाखविला आहे. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील काही समाजकंटक विदेशी एजंटांशी संधान साधून देशामध्ये अशांतता पसरविण्याचे काम करत आहेत. मात्र, देशातील जवानांनी आणि पोलिसांनी खंबीरपणे त्याचा बंदोबस्त केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशिक्षणार्थींना गृहमंत्र्यांचा संदेश

सध्या 9 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या केएसआरपीच्या 216 जवानांनी राष्ट्रध्वजाखाली शपथ घेऊन समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखत लोकशाहीची मूल्ये जपावीत, कायद्याचे कठोर पालन करून समाजसेवा करावी, असा संदेश मंत्री ज्ञानेंद्र यांनी प्रशिक्षणार्थींना दिला.

पोलीस विभागातील रिक्त जागा लवकरच भरण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. 950 पोलीस उपनिरीक्षकांची भरती केली जाणार आहे. याचबरोबर दरवषी राज्यात 4000 पोलिसांची भरती केली जाते. एक लाख कर्मचाऱयांपैकी सध्या 35 हजार पदे रिक्त होती. मात्र सरकारने नियुक्ती करून रिक्त जागा भरून काढल्या आहेत. सध्या केवळ 12 हजार कर्मचाऱयांची भरती करणे शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटक राज्य राखीव पोलीस विभागाचे अप्पर पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रशिक्षण शाळेचे प्राचार्य हंजा हुसेन यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ दिली. यावेळी राज्य राखीव पथकाचे पोलीस महानिरीक्षक रवी एस., पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, राज्याचे सर्व केएसआरपी पथकांचे अधिकारी, केएसआरपीच्या कर्मचाऱयांसह प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.

Related Stories

टिळकवाडीतील बच्चा क्लब लायब्ररी ठरतेय उपयुक्त

Patil_p

सीमाभाग समन्वय कार्यालय बेळगावमध्ये स्थापन करा

Amit Kulkarni

लोककल्प फौंडेशनतर्फे ओलमणीत नेत्रतपासणी शिबिर

Amit Kulkarni

सीमावादावर केंद्राच्या हालचालींना वेग; अमित शाहांनी बोलावली दोन्ही राज्यांची बैठक

datta jadhav

लिलावात ‘बोली’साठी संपूर्ण अनामत रक्कम भरणे बंधनकारक

Amit Kulkarni

1 नोव्हेंबर काळादिन गांभीर्याने पाळा

Patil_p