कर्णधार विराट कोहलीचा विविध आठवणींना उजाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2008 आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत केन विल्यम्सन सर्वाधिक प्रभावशाली खेळाडू ठरला होता, त्यानेच स्पर्धेत सर्वात लक्षवेधी खेळ साकारला, असे प्रतिपादन विराट कोहलीने केले. आश्चर्य म्हणजे विराटने त्याच स्पर्धेला भारताला जेतेपद काबीज करुन दिले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. रविंद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी हे वरिष्ठ संघातील विद्यमान खेळाडूही त्या युवा विश्वचषकात खेळले होते.
‘केन विल्यम्सनविरुद्ध खेळल्याचे मला आजही आठवते. तो नेहमी आपल्या संघसहकाऱयांसमवेत असायचा. त्याची फलंदाजी इतर सर्व फलंदाजांपेक्षा वेगळी होती. केन विल्यम्सन, स्टीव्ह स्मिथसारखे त्यावेळी खेळलेले खेळाडू आज त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघात समाविष्ट आहेत, हे उत्तम आहे’, असे विराट कोहली येथे म्हणाला. आपल्या कारकिर्दीत 2008 चा वर्ल्डकप खास माईलस्टोन ठरला, याचाही त्याने उल्लेख केला. 2008 मधील त्या स्पर्धेत विराटने 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या होत्या.
‘त्या युवा विश्वचषक स्पर्धेमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावण्यापूर्वी उत्तम व्यासपीठही मिळाले. त्यामुळे, या स्पर्धेचे आमच्या मनात वेगळे स्थान आहे. आपल्याला जी संधी मिळाली, त्याचे महत्त्व समजून घेणे व त्याविषयी मनात आदर असणे गरजेचे आहे’, असे विराटने पुढे नमूद केले. 2008 ची स्पर्धा ज्याप्रमाणे विराटने गाजवली, त्याप्रमाणे 2010 मधील युवा विश्वचषक स्पर्धा बेन स्टोक्स, जोस बटलर व विद्यमान कर्णधार जो रुट यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंनी गाजवली,
2010 विश्वचषक स्पर्धेत बेन स्टोक्सने भारताविरुद्ध विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने 88 चेंडूतच 6 षटकारांसह 100 धावांची आतषबाजी केल्यानंतर इंग्लंडने 246 धावांची मजल मारली आणि नंतर या धावसंख्येचे यशस्वी संरक्षणही केले होते. पुढे ते साखळी फेरीनंतर अव्वल राहिले होते.
‘मी भारताविरुद्ध त्या लढतीत उत्तम सुरुवात केल्यानंतर फारसे योगदान देऊ शकलो नव्हतो. पण, बेनने जी खेळी साकारली, ती त्या वयोगटातील एखाद्या खेळाडूची सर्वोत्तम खेळी होती’, असे रुट येथे म्हणाला.