Tarun Bharat

2011 वर्ल्डकप फायनलला ‘क्लीन चीट’

चौकशीत काहीही पुरावे सापडले नाहीत, लंकन पोलिसांकडून चौकशीची फाईल बंद

कोलंबो / वृत्तसंस्था

कुमार संगकारा व महेला जयवर्धने या दिग्गज खेळाडूंची कसून चौकशी केल्यानंतर काहीही पुरावे न आढळल्याने लंकन पोलिसांनी 2011 वर्ल्डकप फायनलला क्लीन चीट देत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. तत्कालीन लंकन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी सदर सामना काही घटकांनी फिक्स केल्याचा दावा यापूर्वी केला होता. त्यावरुन या सामन्याची चौकशी करण्यासाठी लंकन क्रीडा मंडळाने स्वतंत्र चौकशी समिती नेमली होती.

या चौकशी समितीने गुरुवारी संगकाराची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10 तास कसून चौकशी केली व त्यानंतर महेला जयवर्धनेचा जबाबही नोंदवून घेतला. त्यानंतर या समितीने आपला कल स्पष्ट केला.

‘क्रीडा खाते, सचिव यांच्या सूचनेनुसार आम्ही चौकशी केली आणि आता आमचा अहवाल त्यांना पाठवत आहोत. खेळाडूंची आणखी चौकशी करण्याची काही गरज नाही, असे आमचे मत आहे’, असे चौकशी समितीचे प्रमुख, पोलीस अधीक्षक जगथ फोन्सेका यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. फोन्सेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलुथगमगे यांनी जे 14 ठपके लावले, त्यात काहीही तथ्य आढळून येत नाही.

फोन्सेका यांच्या चौकशी समितीने तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अरविंदा डिसिल्वा, तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा, सलामीवीर उपूल थरंगा व महेला जयवर्धने यांना चौकशीसाठी पाचारण केले. यापैकी डिसिल्वाची चौकशी 6 तास तर संगकाराची चौकशी तब्बल 10 तास चालली. याचा श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या कार्यालयासमोर निषेधही केला गेला. अलुथगमगे यांनी अचानक संघात जे बदल केल्याचा ठपका ठेवला, त्याचाही या खेळाडूंनी खुलासा केल्याचे फोन्सेका म्हणाले. लंकन संघाने त्या अंतिम लढतीसाठी आपल्या संघात एकूण चार बदल केले होते.

‘सर्व खेळाडूंना पाचारण करुन चौकशी सुरु करणे हे विनाकारण गोंधळ निर्माण करणारे आहे’, असे फोन्सेका यांनी येथे स्पष्ट केले. तत्कालीन संघातील खेळाडू व पदाधिकाऱयांची चौकशी केल्याने मंडळाला याप्रकरणी रोष ओढवून घ्यावा लागला आणि तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी 9 वर्षांच्या कालावधीनंतर हा मुद्दा उकरुन काढल्याबद्दल त्यांच्यावर देखील टीका झाली. सामना फिक्स केला, त्यात खेळाडूंचा सहभाग नव्हता, असे अलुथगमगे यांचे मत होते. पण, खेळाडूंचा सहभाग नसताना हा सामना फिक्स कसा करण्यात आला, याचे ठोस स्पष्टीकरण ते देऊ शकले नव्हते.

‘त्या’ लढतीबद्दल साशंकता व्यक्त करण्याचे कारण नाही : आयसीसी

दुबई : 2011 वर्ल्डकप फायनल लढतीवर साशंकता व्यक्त करण्याचे काहीच कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने शुक्रवारी स्पष्ट केले. लंकन पोलीस चौकशी समितीने सदर लढतीला क्लीन चीट दिली. त्यानंतर आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केली.

‘आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील त्या अंतिम लढतीबद्दल आमच्या मनात तीळमात्रही संदेह नाही’, असे आयसीसीचे भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीचे महासचिव ऍलेक्स मार्शल यांनी पत्रकातून नमूद केले. आम्ही त्या सामन्यावर नव्याने दृष्टिक्षेप टाकला आणि त्यात आम्हाला काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही, असे मार्शल याप्रसंगी म्हणाले.

‘सामना फिक्स असल्याचा कोणताही ठपका झाला तर आम्ही तो गांभीर्यानेच घेतो. लंकेतून ठपका आला, त्यावेळी आम्ही त्याकडेही गांभीर्यानेच पाहिले. पण, त्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे दिसून येते’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.  लंकन चौकशी समितीने चौकशीची प्रक्रिया बंद करत असल्याची घोषणा करण्यापूर्वी तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अरविंदा डीसिल्वा, तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा, महेला जयवर्धने यांची कसून चौकशी केली.

Related Stories

पैलवान सुशीलकुमार रेल्‍वे सेवेतून निलंबित

Archana Banage

धोनी क्रिकेटमधील सर्वोत्तम सुपरस्टार

Patil_p

ऑलिम्पिकसाठी 26 सदस्यीय ऍथलेटिक्स पथक जाहीर

Patil_p

पोलंडला हरवून अर्जेन्टिना बाद फेरीत

Amit Kulkarni

बुस्टाकडून वावरिंका पराभूत

Patil_p

अमेरिकन गोलंदाज अली खान अबु धाबीत दाखल

Patil_p