Tarun Bharat

2011 वर्ल्डकप विजयानंतर नेहराने मागवले होते 40 आम्लेट!

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला, तो क्षण आजही भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात तितकाच ताजा आहे. डावखुरा मध्यमगती गोलंदाज आशिष नेहराला बोटाच्या प्रॅक्चरमुळे त्या फायनलमध्ये खेळता आले नाही, याचा खेद आहे. पण, तो दिवस नेहरा आजही अजिबात विसरलेला नाही. (लग्नाचा वाढदिवस देखील 2 एप्रिल हाच असल्याने पत्नी रुश्मा ते विसरु देत नाही, असे नेहरा म्हणतो.). मात्र, तरीही वर्ल्डकप विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नेहराने त्यावेळी चक्क 40 आम्लेट मागवले होते आणि या आठवणीला त्याने गुरुवारी उजाळा दिला. 9 वर्षांपूर्वी भारताने याच दिवशी 2011 चा वर्ल्डकप जिंकला होता.

गौतम गंभीरच्या दृष्टीने तो संघातील 20 जणांचा अविस्मरणीय प्रवास होता तर त्या फायलननंतर त्यात खेळलेले 11 खेळाडू पुन्हा एकत्रित का खेळले नाहीत, हे हरभजन सिंगला पडलेले कोडे असते. सध्या गोव्यात स्थित असलेल्या नेहराने त्या फायनलमधील आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला.

‘एकवेळ वर्ल्डकपची फायनल विसरलो तरी मला 2 एप्रिल कधीच विसरता येणार नाही. हा आमच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. आम्ही आज लग्नाची 11 वर्षे पूर्ण केली आणि विश्वचषक विजयाची 9 वर्षे पूर्ण झाली. 11 अधिक 9 केल्यास 20 होतात आणि आपण आता 2020 मध्ये आहोत’, असे नेहरा प्रारंभी स्मित हास्यासह म्हणाला.

त्यानंतर काहीसे गंभीर होत त्याने पाकिस्तानविरुद्ध लढतीतील आपल्या कामगिरीचा उल्लेख केला. तो म्हणाला, ‘मी दुखापतग्रस्त झालो. पण, तो सामना ऐतिहासिक होता. फायनल खेळू शकणार नाही, याचे अर्थातच दुःख होते. पण, 2 एप्रिल हा तो दिवस माझ्या व आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक होता. त्या दिवशी आपण रात्रभर झोपलोच नाही. मला वाटते, माझ्या रुममध्ये हरभजन, झहीर, मुनाफ व आयसीसीतील धीरज चोप्रासारखे काही मित्र सोबत होते. आम्ही रात्रभर जागे राहिलो आणि त्यानंतर मी ब्रेकफास्टसाठी 40 आम्लेट मागवले होते’.

त्या विश्वचषक विजयाला 9 वर्षे पूर्ण होत असताना आता धोनी संघातून खेळणार का, याबद्दल अनिश्चितता आहे. त्या लढतीत सचिनला खांद्यावर उचलून फेरी मारणारा विराट आता संघात सचिनची जागा भरुन काढत आहे तर झहीर खानसारखे खेळाडू निवृत्त झाल्यानंतर प्रँचायझी कोचिंगकडे वळले आहेत. धोनीच्या षटकारासह भारताच्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यावेळी समालोचन करताना अक्षरशः उसळलेले रवी शास्त्री आता मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

अर्थात, त्या विजयाचे श्रेय आताही 97 धावांची धमाकेदार, संयमी खेळी साकारणाऱया गौतम गंभीरलाच दिले जाते. सचिन-सेहवागसारखे अव्वल खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर गंभीरने प्रतिस्पर्ध्यांवर अक्षरशः तुटून पडत विजय खेचून आणला होता. स्वतः गंभीर मात्र या विजयाचे श्रेय सांघिक खेळाला देतो आणि हरभजन देखील त्याच्याशी सहमत आहे.

‘इंग्लंडविरुद्ध झहीर खानने सामना टाय करुन दिला नसता तर तेथे आपण अपयशी ठरलो असतो. युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गाजवला. सचिनने उपांत्य फेरी जिंकून दिली आणि निर्णायक अंतिम लढतीत गौतम गंभीर व माही संघासाठी धावून आले. तो विश्वचषक सांघिक खेळामुळेच जिंकता आला’, अशा शब्दात हरभजनने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Stories

‘मी निवृत्त होतेय’: सिंधूच्या पोस्टने खळबळ

Patil_p

अर्जेन्टिना दौऱयात भारताचा पहिला पराभव

Patil_p

ऑस्ट्रेलिया, श्रीलंका संघांची विजयी सलामी

Patil_p

पीव्ही सिंधू, के.श्रीकांतची विजयी सलामी

Patil_p

गरीबाच्या घरातच पैलवान तयार होतो

datta jadhav

एक महिन्याचे वेतन क्रीडामंत्र्यांकडून जाहीर

tarunbharat