वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संस्था 2021 च्या अखेरपर्यंत मानवरहित गगनयानचे पहिले प्रक्षेपण करणार आहे. त्याच्यासोबत एक स्वदेशी रोबोटही पाठविण्याची योजना आहे. ही मोहीम 2020 मध्ये साकारली जाणार होती, परंतु कोरोना संकटामुळे ती टाळण्यात आली आहे.
हा प्रकल्प इस्रोच्या मानवी अंतराळ मोहिमेचा हिस्सा आहे. 2022 मध्येही आणखी एक मानवरहित अंतराळयान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ह्युमन रेटिंगची प्रक्रिया योग्यप्रकारे पुढे जात आहे. 2021 च्या दुसऱया सहामाहीत ती पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी दिली आहे.
खासगी क्षेत्राची भागीदारी
गगनयान प्रकल्पासाठी इस्रो खासगी क्षेत्राचीही मदत घेत आहे. देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी कंपनी लार्सन अँड टुब्रोला गगनयान प्रक्षेपकासाठी हार्डवेअर तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाचे संकट असतानाही जगातील तिसरे सर्वात मोठे सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट बूस्टर एस-200 च्या मीडिल सेगमेंटचा पुरवठा करण्यात आल्याचे कंपनीकडुन सांगण्यात आले.
व्योममित्राची अंतराळवारी
इस्रो या अंतराळयानासोबत स्वदेशात विकसित रोबोट ‘व्योममित्र’ पाठविणार आहे. प्रायोगिकतत्वावर हे पाऊल उचलण्यात येत आहे. हा रोबोट माणसांप्रमाणे अंतराळातून इस्रोला अहवाल पाठविणार आहे.